पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चाळीस वर्षामध्येही या विभागांनी देशातल्या आघाडीच्या संशोधनशाळांमध्ये स्थान मिळवलेलं नाही. याला एक उल्लेखनीय अपवाद आहे तो विद्यापीठाच्या रसायन-तंत्रज्ञान विभागाचा. पण, त्याचीही स्थापना स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासच झाली. सुरुवातीपासून त्यानं जवळजवळ स्वतंत्रपणे आपला कारभार हाकला आणि आज तर तो स्वायत्त झाला आहे. आता तो 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' झाला आहे. विज्ञान-संशोधनाचा संस्थात्मक विकास महाराष्ट्रात फारसा झाला नाही. मुंबईत स्थापन झालेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातली पहिली संशोधनसंस्था. पुण्याला आघारकरांनी स्थापन केलेली 'महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' ही महाराष्ट्रीय वैज्ञानिकांनी स्थापन केलेली पहिली संस्था म्हणावयास हरकत नाही. हाफकिन इन्स्टिट्यूटचे प्रणेते युरोपियन असल्यामुळं त्या संस्थेला थोडाफार राजाश्रय तरी मिळाला. पण, आघारकरांच्या संस्थेला ना राजाश्रय ना लोकाश्रय. त्यामुळं तिची व्हावी तशी भरभराट झाली नाही. केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागानं तिचं मुखत्यारपत्र स्वीकारल्यानंतरच त्या संस्थेला काही बळ प्राप्त झालं आहे. याचा अर्थ, महाराष्ट्रात विज्ञान-संशोधन झालंच नाही किंवा महाराष्ट्रीय वैज्ञानिकांनी लक्षणीय योगदान दिलेलं नाही असा होत नाही. पण, महाराष्ट्रीय वैज्ञानिकांना लक्षवेधी संशोधनासाठी महाराष्ट्राबाहेरच्या व क्वचितप्रसंगी देशाबाहेरच्या संस्थांकडे प्रयाण करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे. तसंच, महाराष्ट्रात आज कार्यरत असलेल्या आणि जगभरात ज्यांनी नाव कमावलं आहे अशा विज्ञानसंस्था या मुख्यत्वे राष्ट्रीय स्वरूपाच्या केंद्र सरकारच्या विविध विभागांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यांचे अध्वर्दू कित्येक वेळा महाराष्ट्र ही जन्मभूमी नसलेले राहिले आहेत, परंतु त्यांची संपूर्ण वैज्ञानिक कारकीर्द महाराष्ट्रातच व्यतीत झालेली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक विकासाला हातभार लावलेला आहे. पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्रातील कित्येक कृषी विद्यापीठे या संस्थांतील विज्ञान संशोधन, तंत्रज्ञान विकास उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्रात अलीकडच्या काळात विज्ञान-संशोधनानं मूळ धरलं आहे, पण महाराष्ट्रातील विज्ञानसंस्था म्हटल्यानंतर ज्यांची नावं सर्वप्रथम नजरेसमोर येतात, त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेन्टल रिसर्च, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेन्टर, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजी, नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्था केंद्रीय संस्था आहेत. त्या महाराष्ट्रात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रीय मानायचं की काय, हा वादाचा विषय होईल, पण त्यांच्या स्थापनेच्या काळात आणि नंतरही त्यांच्या विकासात महाराष्ट्रीय वैज्ञानिकांचं योगदान लक्षणीय राहिलेलं आहे. महाराष्ट्रीय समाजाच्या मानसविश्वात या संस्थांनी लोभाचं स्थान प्राप्त केलेलं नाही हे एकंदरीतच विज्ञान-संशोधनाच्या बाबतीतल्या महाराष्ट्रीय समाजाच्या अनास्थेचं द्योतक आहे. अशीच अनास्था महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनीही दाखवलेली आहे. शासनाच्या स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान विकासाच्या कोणत्याच योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यापायी संशोधनसंस्थांचीही स्थापना झाली नाही. विद्यापीठांमधील संशोधनविकासाकडेही शासकीय स्तरावर दुर्लक्षच झालं आहे. तेव्हा, महाराष्ट्राचे विज्ञान-तंत्राज्ञान शिल्पकार यांची निवड करताना या वास्तवाची दखल न घेणं परवडणारं नाही. म्हणूनच जन्मभूमी महाराष्ट्र किंवा कर्मभूमी महाराष्ट्र किंवा दोन्हीही असणाऱ्या दिग्गजांचा महाराष्ट्राच्या शिल्पकारांमध्ये समावेश करण्याचा व्यापक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक आहे. असाच विस्तारित दृष्टिकोन विज्ञान-तंत्रज्ञान विषयांची व्याप्ती ठरवण्यासाठीही आवश्यक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवविज्ञान यांसारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांना, तसंच त्यांच्या आपापसातील सहयोगापायी स्थापन झालेल्या जैवरसायनशास्त्र, जैवभौतिकशास्त्र, रेण्वीयजीवशास्त्र यांसारख्या २६ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश