पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवश्यक ती सामाजिक परिस्थिती आणि शांतीचं वातावरण महाराष्ट्रात नव्हतं. शिवाय, पाचव्या-सहाव्या शतकापासून पुढची दहा शतकं आपल्या देशातही एक अंधारयुगच अवतरलं होतं. या काळात सांस्कृतिक क्षेत्राच्या कोणत्याही पैलूला झळाळी दिली गेल्याच्या कोणत्याच खुणा नाहीत. त्यात परकीय आक्रमण आणि प्रशासन यांपोटी एकोणिसाव्या शतकापर्यंत सर्जनशील कृतींचा अभावच आढळतो. __ अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात काही प्रमाणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होत राहिला होता, याचे काही प्रत्यय मिळतात. महाराष्ट्रात शिवाजीच्या काळी प्रत्येक गड-किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. पेशव्यांनी पुण्यात कात्रजच्या घाटातून शहरापर्यंत पाण्याची भूमिगत सोय केली होती आणि आज २०० वर्षे झाल्यानंतरही ती अजूनही वापरात येऊ शकेल इतकी धड अवस्थेत आहे. अशीच सोय अन्य शहरांतूनही आहे. दि.मा. मोरे यांनी महाराष्ट्रातील जुन्या काळच्या पाणी योजनेवर आणि अ.शं. पाठकांनी 'महाराष्ट्राची बारव संस्कृती' यावर पुस्तकं लिहिली आहेत. वालचंद हिराचंद आणि किर्लोस्कर बंधू यांनी महाराष्ट्रात कारखानदारी सुरू केली. मुंबईतही कापडगिरण्या सुरू झाल्या. द.बा. लिमये यांनी रसायनशास्त्रात काम केलं, तर वि.ना. शिरोडकर यांनी सूतिकाशास्त्राच्या शस्त्रक्रियेत विकसित केलेला 'शिरोडकर स्टिच' आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरला गेला. अभियांत्रिकी क्षेत्रात अलीकडे कोकण रेल्वेनं बांधलेले उंच-उंच पूल हे जागतिक पातळीवर चर्चेचे विषय झाले. कोयना धरणात दोन वर्षांपूर्वी लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाला. नगर जिल्ह्यात हिवरे बाजार या गावात ज्या ठिकाणी जमिनीखाली पाणी साठत नव्हतं, अशा ठिकाणी जमिनीखाली सुरुंग लावून चिरा पाडल्या आणि आता तेथे पाणी साठू लागलं आहे. त्यामुळं आधुनिक विज्ञान अध्ययनाच्या मुहूर्तमेढीसाठी आपल्याला एकोणिसाव्या शतकाच्या मध्याकडे ध्यान द्यावं लागतं. 'हिंदुस्थान' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशावर आता इंग्लंडच्या राणीचं साम्राज्य प्रस्थापित झालं आहे आणि ती सम्राज्ञी व्हिक्टोरिया या नावानं देशाचा कारभार करण्यास सज्ज झाली आहे, अशी दवंडी पिटली जात असतानाच, देशात तीन विद्यापीठांच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या समाप्तीनंतर बॉम्ब - आताचं मुंबई., मद्रास - आताचं चेन्नई आणि कलकत्ता - आताचं कोलकाता या ठिकाणी उच्च शिक्षण देणारी विद्यापीठ स्थापन केली गेली. ___ या तीन विद्यापीठांचा जन्म जरी एकाच वेळी झाला असला, तरी पुढील प्रवास मात्र वेगवेगळ्या मार्गानं होत गेला. विज्ञान - संशोधनानं जोम धरला तो कोलकाता विद्यापीठात. भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये संशोधन करणारे विभाग तिथं प्रस्थापित झाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांच्या उच्च शिक्षणालाही तिथं प्रारंभ झाला. त्याचीच परिणती पुढं त्या क्षेत्रांना वाहिलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेत झाली. प्रयोगशाळा आणि संशोधनसंस्था यांचीही स्थापना होत गेली. जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र रे, मेघनाद साहा, महेन्द्रलाल सरकार यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदारांनी विज्ञानाची पताका फडकवत ठेवली. कोलकाता विद्यापीठ आणि विज्ञान संशोधन यांची इतकी एकजीव सांगड बसली की नोबेल पुरस्कारविजेते चंद्रशेखर व्यंकटरमन यांचं शिक्षण मद्रास विद्यापीठात झालेलं असतानाही संशोधनासाठी त्यांनी कोलकात्याचीच वाट धरली. त्यांचं नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं संशोधनही तिथंच झालं. ज्यांनी महाराष्ट्रात विज्ञानवर्धिनीची प्रतिष्ठापना केली, त्या वनस्पतिशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकरांची कारकीर्दही तिथंच फुलली, फोफावली आणि ती मान्यता मिळाल्यानंतरच ते महाराष्ट्रात आले. मुंबई विद्यापीठात मानव्यविद्या आणि कायदा या क्षेत्राला मान देण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यातील कित्येक धुरिणांनी या विषयात मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवूनच आपल्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. मुंबई विद्यापीठात विज्ञान-संशोधनाचे विभाग सुरू झाले ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात. त्यानंतर गेल्या तीस- शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / २५