पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहस्रबुद्धे, पुरुषोत्तम गणेश
साहित्य खंड
 

आपल्या समाजाचा, तसेच समाजशास्त्राचा, राजकारणाचा अभ्यास सुरू केला. १९३९ ते १९४३ या काळात ते केवळ अभ्यास, मनन आणि चिंतन करत होते.
 याच काळातच ते 'नूतन मराठी विद्यालयात' शिक्षकही होते. शाळेत त्यांचा पांढरा पोलो कॉलरचा शर्ट, काळा कोट, काळी टोपी, धोतर व वहाणा असा वेश असे; आणि त्यातूनही त्यांचे व्यायामाने कमावलेले शरीर लक्षात येई. ताठ मानेने झपझप चालण्याची त्यांची सवय प्रारंभापासून होती. ते शाळेत मुलांच्या शिस्तबद्ध सहली काढत. त्यांना निसर्गाचे रौद्ररूप आवडे. मुलांबरोबरीने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल हे मैदानी खेळ खेळत; पण त्यांचे विशेष प्रेम धसमुसळ्या रग्बीवर होते. इतके की, त्यासाठी त्यांनी 'गेंडा क्लब' स्थापन केला होता. मैदानी खेळातून शिस्त येते असे त्यांचे मत होते. १९४३ नंतर जवळजवळ बारा वर्षे ते नियमित रोज दीड-दोन तास फिरायला जात असत.
 १९२८ ते १९४६ पर्यंत शाळेत शिक्षक म्हणून काढल्यावर १९४६ पासून ते १९६४ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. विद्यार्थ्यांविषयी मनात ममता असली, तरी बाह्यतः ते कठोर होते. पण अभ्यासू, हुशार मुलांसमोर तो कठोरपणा फार काळ टिकत नसे. १९४६ च्या प्रारंभीच्या काळात समाजजागृती करणारे लेखक- वक्ते विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, या हेतूने ते विद्यार्थी मंडळही चालवत होते. त्यांनी १९४९ पर्यंत हा प्रयोग केला.
 १९४३ मध्ये त्यांचे मित्र दत्तप्रसन्न काटदरे यांनी 'वसंत' मासिक सुरू केले. १९४३ च्या 'वसंत' दिवाळी अंकात त्यांनी 'राष्ट्रीय अहंकार' या विषयावर लिहिले. त्यातूनच 'अहंकार' विषयक लेखमाला तयार झाली. तेव्हापासून १९७९ पर्यंत ते सातत्याने 'वसंत'साठी लिहिते राहिले.
 त्यांचे गुरू- माटे मास्तरांनी- ललित लेखनातून जे समाज जागरण करण्याचा प्रयत्न केला, त्याची पुढची पायरी डॉ. सहस्रबुद्धे यांनी आपल्या निबंधांतून गाठली. त्यांची अशी एक लेखनप्रवृत्तीही ठरून गेली. ते श्रेष्ठ निबंधकार होते; ते चिपळूणकर, आगरकर, टिळक, राजवाडे, माटे या परंपरेतले; जवळजवळ शेवटचेच शिलेदार होते. राजकीय विश्लेषणाबरोबरच सामाजिक निदानही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
 आपला विषय मांडताना ते विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा व बुद्धिस्वातंत्र्य ह्यांचा पुरस्कार करतात. विषयाचा प्रवास विश्लेषणातून विचारमंथनाच्या मार्गाने प्रबोधनाकडे होतो; त्यांच्या लेखना/ व्याख्यानातून काहीसा अहंकारयुक्त आवेश असे. विवेचनाच्या ओघात पूर्वपक्ष- उत्तरपक्ष करत, खंडनमंडनात्मक पद्धतीने जाताना प्रसंगी विनोद, कोट्या असत. त्यांची वाणीही लेखणी- उद्दीपक आणि वेधक जाणवे. केवळ मुद्यांधारे विषय मांडताना श्रोत्यांच्या/ वाचकांच्या बुद्धीस आवाहन केलेले असे. तर्काचे बारकावे सांभाळत आधार-प्रमाणे देत विषय मांडताना ते श्रोत्यांना कधी ताब्यात घेत, हे कळतही नसे. उपहास, उपरोध, व्याजोक्ती, वक्रोक्ती, व्यंजना यांच्याबरोबरीने विषय प्रतिपादनार्थ समर्पक उपमा-दृष्टान्तही येत; पण विशेषत्वाने भर जाणवे तो उपहास- उपरोधाच्या धारेचा प्रभाव. आणि व्याख्यानान्ती विषयासंबंधीचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचे समाधानही अभ्यासूंना मिळत असे.
 आपल्या निबंधांची सुरुवात बऱ्याचदा ते नाट्यमय, चित्रमय रितीने करत, तसाच शेवटही नाट्यपूर्ण, लालित्यपूर्ण असे. त्याचे काहीसे आकर्षणच मनात असे. सुरुवातीस ते भाषासौंदर्यासाठी प्रयत्न करत असत. नंतर ते साधले व त्यांच्या शैलीचेच अविभाज्य अंग झाले. निबंधाची जडणघडण कुशलतेने करणाऱ्यास जीवनात कोणतीही जबाबदारी पार पाडता येते अशी श्रद्धा असल्याने, त्यांनी प्रत्येक विषय त्याच पद्धतीने मांडला.

डॉक्टर मूलतः मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा साहित्यविचारही त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांशी निगडित होता. त्यांची वाङ्मयविषयक भूमिका स्थिर असल्याने बदलत्या वाङ्मयप्रवाहाशी तसेच टीकाविचारातील नवतेशी ते समरस होऊ शकले नाहीत.


६२८
शिल्पकार चरित्रकोश