पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८३)

या दोन्ही प्रतिमा हजर होतात. नंतर त्यांची तपासणी अवधानाच्या देखरेखीखाली होते. तपासणीत असे आढळून येते की, या दोहोंत कांहीएक विवक्षित प्रकारचे नाते आहे.नंतर मन निकाल सांगते की ' कुत्रा' हे एक जनावर आहे.
 निर्णय हा जो मनोव्यापार आहे त्याचे जर आपण पृथक्करण केले तर त्यांत मुख्य दोन घटकावयव आहेत असे आढळून येईल- (१) तुलना आणि ( २ ) निकाल. वरील उदाहरणांत 'कुत्रा' व जनावर ' या सामान्य कल्पनांची प्रथम तुलना होते. पुढे कुत्र्याच्या अंगी जनावरपणा आहे, जनावरांत त्याचा समावेश करण्यास हरकत नाही, असे विचाराअंती मनास आढळून येते व नंतर ' कुत्रा हे जनावर आहे' (मनुष्य नव्हे, पक्षी नव्हे) हा सिद्धांत ठरतो. [येथे जनावर म्हणजे चतुष्पाद असा अर्थ घेतला आहे.]
 निर्णय हा एक स्वतंत्र निराळा मनोव्यापार आहे असे जरी येथे सांगितले आहे तरी प्रत्येक व्यापारांत त्याचा समावेश होतो हे येथे सांगितले पाहिजे. वर बोध व सामान्यभावग्रहण या व्यापारांचे वर्णन दिलेच आहे. त्यावरून त्या व्यापारांस निर्णयाची कशी आवश्यकता लागते हे ध्यानात येईल. निर्णय या व्यापाराचे प्रधान अंग तुलना हा व्यापार होय. ज्या ज्या मनोव्यापारात तुलना या व्यापाराची जरुरी असेल त्या त्या मनोव्यापारांत निर्णय असतोच. हे मनोव्यापार एकमेकांहून भिन्न मानले आहेत हे केवळ सोईकरितां हाय. खरोखर ते मुळीच भिन्न नाहीत.
 निर्णय या मनोव्यापारास लागणाऱ्या आवश्यक गोष्टीः-
 (१) प्रथम जरूर ते द्रव्य पाहिजे. हे द्रव्य कोणतें तें वर सांगितलेच आहे. निरीक्षणशक्तीचाहि बराच विकास झालेला पाहिजे, व स्मरणशक्तिहि चांगलीशी पाहिजे.
 (२) प्रवर्तकशक्तीची मदतहि पाहिजेच. अवधान एकाग्रकरितां आले पाहिजे. निर्णय योग्य करावयाचा असेल तर भाव-