पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७६)

रतो त्यांवर अवलंबून असते. आपला विचार नेहमी शब्दांनींच चालतो. विचारशक्ति जे काही निर्णय करिते ते दृढ करण्याच्या कामी आपणांस शब्दच वापरावे लागतात. उदाहणार्थ,'तांबडा हा शब्द वापरल्यामुळे आपणांस एका विशेष प्रकारच्या गुणाचें ज्ञान मनांत सांठविता येते. प्रत्येक शब्दाचा तरी उपयोग हाच. शब्द आहेत म्हणूनच सर्व मनोव्यापार चालले आहेत. मांजर, कुत्रे, यांसारख्या शब्दांनी दर्शविलेला सामान्यवोध, विचारशक्तीस फारसा ताण न पडता होतो. परंतु 'प्राणी' या शब्दाची कल्पना बरोबर येण्यास मात्र बराच त्रास पडतो.वर निष्कर्ष म्हणून सामान्यवोधाच्या घटकावयवांपैकी जो तिसरा मनोव्यापार सांगितला आहे, तो व तुलना हे व्यापार बरेच झाल्याविना 'प्राणी' या शब्दाने दर्शविलेली खरी कल्पनाच होत नाही. तांबडेपणा वाटोळेपणा यांसारख्या भाववाचक नामांमुळे जो काही सामान्यबोध होतो, त्यांत तर एक विशेषप्रकारचे निष्कर्ष व्हावे लागते. कारण या ठिकाणी अवधानशक्ति एका विवक्षित गुणाच्या ठायीं एकाग्र करावी लागते.
 सामान्य बोधशक्तीची वाढ- अगदी लहान मुलाच्या म्हणजे वर्षदीड वर्षाचे मुलाच्या ठायीं ही मानसिक शक्ति नसते असे म्हटले तरी चालेल; त्याचे मुख्य मनोव्यापार संवेदन व तज्जनित बोध हे होत. दोन वर्षांच्या मुलाच्या ठिकाणी विचारशक्तीचा थोडा बीजांकुर दिसू लागतो.मूल पदार्थांची तुलना करूं लागले म्हणजे विचारशक्तीचा उदय झाला असे समजावें. मुलास साधारण बोलतां चालतां येऊ लागले म्हणजे ते 'तुलना' हा मनोव्यापार करू लागते व अमुक एक वस्तु वाईट आहे, चांगली नाही, घाण आहे, यांसारखी वाक्ये उपयोगांत आणिते. चार वर्षांची मुलें नवीन नवीन शब्द शोधून काढितात, व दुसऱ्याच्या ऐकलेल्या शब्दांचा उपयोग जरा विस्तृत रीतीने करूं लागतात. या वयांत अंधक सामान्यबोध होत असतो असे म्हटले तरी चालेल. पहिल्या चारपांच वर्षांत मूल निरनिराळ्या पुष्कळ वस्तु पाहते, व त्या सर्व वस्तूंचे त्यास जें ज्ञान