पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७५)

णांस होणारे पदार्थांविषयींचें सामान्य ज्ञान पुष्कळ वेळां चुकीचे असते.असो; एकंदरीत पदार्थांच्या जातीचे सामान्य गुणधर्म दर्शविणारी जी काल्पनिक प्रतिमा तीस सामान्यबोध अगर सामान्यकल्पना असे म्हणावे. थोडक्यात सांगावयाचे असल्यास सामान्यअर्थयुक्त जी कल्पना तीस सामान्यबोध असें म्हणण्यास हरकत नाही. सामान्य कल्पना तयार होण्यास लागणारा कच्चा माल स्मृति पुरविते हे वर लिहिलेल्या सामान्यभावग्रहण या व्यापाराच्या वर्णनावरून ध्यानांत आले असेलच. एखादा पदार्थ वरचेवर पाहिल्यामुळे व ओळखल्यामुळे आपल्या मनावर विवक्षित त-हेचा ठसा उमटतो. याच ठशांतून काढिलेल्या प्रतिमेवर तुलना व गुणधर्मपृथकरण या मनोव्यापारांचे कार्य होऊन नंतर त्यापासून सामान्यबोधाची उत्पत्ति होते. प्रथम या व्यापारामुळे विवक्षित वस्तूची स्पष्ट कल्पना आपणांस होते व नंतर त्या वस्तूच्या जातीची सामान्य कल्पना उत्पन्न होते. मूल वरचेवर आपले आईस पाहातें, ओळखतें व नंतर आपल्या आईची मनांत जी एकप्रकारची प्रतिमा राहाते ती दर्शविण्यासाठी काहीएक शब्द उपयोगांत आणितें. तथापि ' आई ' या शब्दानें ध्वनित जी कल्पना ती मुलाच्या मनांत नसते हें खास. ही सामान्य कल्पना त्यास होण्यास बराच काल लोटावा लागतो; व विचार वगैरे मनोव्यापारांचे कार्य, मनांत असलेल्या अंधकसामान्यकल्पनेवर व्हावें लागते. कुकू, माऊ, हम्मा यांसारखे कितीतरी शब्द मुले नेहमी वापरतांना आपण पहातो. परंतु या शब्दांनी दर्शित ज्या सामान्य कल्पना त्या मात्र मुलांच्या मनांत नसतात, याबद्दल त्यांना प्रश्न करून पाहिल्यास खात्री होते.

 पदार्थांची नांवे, व सामान्यबोध या व्यापाराशी त्यांचा संबंधः-आपण जे भिन्न भिन्न पदार्थ पाहातो ते दर्श-विण्याकरितां कांहीं शब्द वापरतो. या शब्दांमुळेच स्मरणशक्तीचे काम चालतें, व तिला पुष्कळ मदतहि होते. विचार म्हणून जो उच्च मनोव्यापार आहे व ज्याचाच एक भाग सामान्यबोध हा व्यापार होय, त्याचे अस्तित्व सुद्धा मुख्यतः आपण जे शब्द वाप-