पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७७)

होत असतें तें एकसारखें मनांत सांठवीत असते. निरनिराळ्या वस्तूंमधील साम्य व भेद हुडकून काढणे याकडे मनुष्याच्या मनाचा स्वाभाविक कल असतो; व म्हणूनच ज्या वस्तूंत साम्य दृष्टीस पडेल त्यांचा एक स्वतंत्र वर्ग करण्याकडे मुलांच्या मनाची नैसर्गिक प्रवृत्ति असते.
 पहिल्या पहिल्याने मुलांस जो काही सामान्यबोध होत असतो तो बोध म्हणजे एक प्रकारचे कोतें वर्गीकरण असते असें म्हटल्यास हरकत नाही. मुलें चहा, दूध, साखर हे शब्द उपयोगांत आणितात, परंतु ' पेय ' या शब्दासारखा सामान्य अर्थसूचक शब्द त्यांचे भाषणांत ऐकिवांत येत नाही. ज्या वस्तूंशी मुलांचा नेहमी संबंध येतो, त्या वस्तूंचीच सामान्यनामें प्रथम मुलांचे भाषणांत दिसू लागतात. दूध ( दुधू), घोडा ( गिगी ), मांजर (माऊ ), असलेच शब्द मुलें प्रथम बोलू लागतात. सामान्यबोध हा खरा मनोव्यापार होण्यास बराच काल लागतो. तथापि या व्यापारास बालपणींच आरंभ होतो असे म्हटल्यास हरकत नाही. कालचे दूध व आजचे दूध यांमधील फरक मुलांचे ध्यानांत हळू हळू येऊ लागतो. तसेच काही काही क्रियांमधील साम्यहि मुलांना दिसू लागते. कुत्रा भुंकू लागला की ‘कुकूला खोक्का ( खोकला ) आला' असें मुलें म्हणतात. मुलें प्रथम प्रथम जे शब्द वापरतात ते कोणत्या अर्थाने वापरतात हेच अगोदर आपणांस समजत नाही. यामुळे त्यांचे मनांत कोणता व्यापार होत असावा याबद्दल काहीच तर्क चालत नाही. उदाहरणार्थ 'बाबी, (बाहुली) याचा अर्थ बाहुली द्या, बाहुली घ्या, बाहुली कोठे आहे, बाहुली पडली, काय वाटेल तो होईल. पुष्कळ वेळां मुले विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणेच करितात. तसेंच संख्येची कल्पना लहान मुलांस मुळीच नसते म्हटले तरी चालेल. थोडे व पुष्कळ यांमधील भेद मात्र त्यांना समजतो. तसेंच गतकालच्या गोष्टीसंबंधी बोलतांना मुलें ' काल अगर उद्यां' हे शब्द घोटाळचाने वापरतात. साधारणपणे मुले दहाबारा वर्षांची होईपर्यंत त्यांचे