पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

समावेश होतो; (१) सामान्यबोध (२) निर्णय आणि (३) अनुमान. दुसरा व तिसरा व्यापार बरोबर होण्यास आपले मनांत सामान्य कल्पनांचा बराच भरणा पाहिजे. या सामान्य कल्पनांत कोणतीहि न्यूनता असता कामा नये. त्या स्पष्ट व असंशयात्मक असल्या पाहिजेत. सामान्यबोध, अनुमान व निर्णय असे विचाराचे जे तीन विभाग केले ते केवळ सोयीकरिता केलेले आहेत. सामान्यभावग्रहण हा व्यापार मूल प्रथम करूं लागते, नंतर निर्णयास सुरवात होते व अगदी शेवटीं अनुमान या उच्च मनोव्यापारास आरंभ होतो, अशांतला प्रकार नाही. अगदी साधा मानसिक व्यापारज्यास आपण बोध ही संज्ञा दिलेली आहे त्यांतसुद्धा निर्णय या व्यापाराचा थोडाबहुत अंश असतोच. तसेंच मूल तीन-चार वर्षांचे जरी असले तरी ते अनुमान हा व्यापार थोडाबहुत करीत असतेच. या वयांत खरोखर मुलांची निरीक्षणशक्ति फारच कोती असते. सामान्यभावग्रहणाचा तर त्यांचे ठायी अभावच असतो. अशी जरी स्थिति असते, तथापि अमुक मनुष्य वाईट आहे, कारण तें मारतें, अशासारखी अनुमाने मुलें करितात, हे पुष्कळांचे अनुभवास आले असेलच.
 सामान्यभावग्रहण हा मनोव्यापार थोडा गहन आहे, हे वर दिलेल्या त्याच्या स्वरूपावरून लक्षात आले असेलच. मोठमोठ्या माणसांच्यासुद्धां सामान्य कल्पना चुकीच्या असतात. याचे कारण त्यांच्या निरीक्षणाचा कोतेपणा हे होय. देवमासा म्हणून जो समुद्रांत राहणारा प्रचंड व भयंकर प्राणी आहे त्यास पुष्कळ मोठमोठी माणसें चुकीने मासा असे म्हणतात. खरोखर तो मासा नव्हे. तसेंच पाकोळी म्हणून एक उडणारा किडा असतो त्यास आपण पक्ष्यांच्याच वर्गात घालितों, याचे कारण आपलें निरीक्षण अपुरें असते हेंच होय.
 (१) अस्पष्ट बोध, (२) अपुरे निरीक्षण, (३) अपूर्ण निष्कर्ष, ( ४ ) अर्थाकडे पूर्ण लक्ष न देता भाषेत वापरण्यांत येणारे शब्द, (५) स्मृतीचा बरेवाईटपणा, इत्यादि गोष्टींमुळे आप-