पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७३)

सर्वांचे निरीक्षण करितें, व सर्वांत आढळून येणारे गुणधर्म एकीकडे काढून ठेविते. अशा त-हेने आपणांस सामान्यज्ञान होते. या सामान्यज्ञानाचा बरेवाईटपणा मनासमोर हजर केलेल्या प्रतिमांच्या पूर्णपणावर व स्पष्टपणावर अवलंबून असणार. या प्रतिमांचा चांगलेवाईटपणा इंद्रियद्वारे पूर्वी झालेल्या बोधाचे बरेवाईटपणावर अवलंबून असतो. तात्पर्य-संवेदनापासून बोधाची उत्पत्ति, बोधापासून प्रतिमांची ( कल्पनांची ) उत्पत्ति आणि त्या प्रतिमांपासून सामान्य ज्ञानाची उत्पत्ति होते. पुढे दिलेल्या आकृतीवरून हे स्पष्ट होईल.

सामान्य ज्ञान. प्रतिमा. बोध. संवेदन.

 वर सामान्यभावग्रहण म्हणून जो मनोव्यापार सांगितला त्याचे जर पृथक्करण केले तर त्यांत तीनचार घटकावयव सापडतील; ते येणेप्रमाणे.-(१) निरीक्षण, (२) तुलना, (३) निष्कर्ष,(४) सामान्यबोध अगर सामान्यसंकलन. आतां वर लिहिलेलेंच उदाहरण घेऊ. कुत्रा या जातिवाचक शब्दाने दर्शविलेली सामान्य कल्पना पूर्णपणे मनांत उतरण्यास प्रथम पुष्कळ निरनिराळ्या कुत्र्याचे निरीक्षण बरेच वेळा झालेले असले पाहिजे. नंतर स्मृतीकडून पूर्वी पाहिलेल्या निरनिराळ्या कुत्र्यांच्या प्रतिमा घेऊन त्यांची तुलना केली पाहिजे. नंतर सर्व प्रतिमांत असणारे गुणधर्म वेगळे काढून एकत्र केले पाहिजेत. याच व्यापारास वर निष्कर्ष हे नांव दिलें आहे. शेवटी हे एकीकडे काढून ठेविलेले गुणधर्म एकत्र करून त्यांचा जो एक पदार्थ बनतो त्याच्यामुळे आपणांस सामान्यबोध होतो.
 विचार म्हणून जो उच्च मनोव्यापार आहे त्यांत तीन मनोव्यापारांचा ७