पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

तऱ्हेचे ज्ञान आपणांस विचारशक्तीचे मदतीने होते व हेच ज्ञान फार महत्त्वाचे असते. 'झाड' या शब्दाने दर्शविलेली कल्पना आपणांस प्रत्यक्ष इंद्रियद्वारे होत नाही, अगर कल्पनाशक्तीच्या द्वारेहि होत नाही. आपण ज्यास 'झाड' असे म्हणतों तो पदार्थ खरोखर अस्तित्वातच नाही. त्याचे अस्तित्व केवळ काल्पनिक आहे. आंब्याचे झाड, चिंचेचे झाड, बाभळीचे झाड, अमुक झाड, तमुक झाड अशी विवक्षित त-हेची झाडे मात्र असू शकतील. परंतु या सर्वांत जे काही सामान्यखरूप आढळते, तेवढेच फक्त ज्यांत असते, त्या पदार्थास 'झाड' म्हणतात; अर्थात् याचे अस्तित्व असणे शक्यच नाही. मात्र 'झाड' या शब्दाने दर्शविलेली सामान्यकल्पना एका मानसिकशक्तीस ग्रहण करितां येते. या शक्तीचे व्यापारास आपण सामान्यभावग्रहण असें म्हणूं. कल्पनाशक्तीचे व्यापारामुळे एक विवक्षित काल्पनिक चित्र मनासमोर उभे राहाते; परंतु सामान्यभावग्रहण म्हणून जो मानसिकव्यापार होत असतो, त्याचा संबंध कांही विवक्षित पदार्थाशी नसून त्या पदार्थाच्या जातीशी अगर सामान्यखरूपाशी असतो. हा व्यापार झाल्यानंतर आपल्या मनासमोर ज्या काही प्रतिमा येतात त्या दर्शविण्याकरितां आपण ज्या शब्दांचा उपयोग करितों त्यांसच व्याकरणांत सामान्यनामें म्हणतात. या सामान्यनामांनी दर्शविल्या जाणाऱ्या कल्पना ग्रहण करणारी शक्ति जर आपल्या मनाचे ठायीं नसती तर स्मरणशक्तीवर फार ताण पडला असता; यावरून या शक्तीचे महत्त्व किती आहे हे लक्षात येईल.
 सामान्यज्ञान व विशेषज्ञान ही एकमेकांहून फारशी भिन्न आहेत असे म्हणता येणार नाही. एकाची उत्पत्ति दुसऱ्यापासून होते; याच्या स्पष्टीकरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. 'कुत्रा' या शब्दानें जो कांहीं मनावर बोध होतो तो कसा होतो याचा आपण थोडा विचार करूं. प्रथम आपण जे निरनिराळे कुत्रे अगोदर पाहिले असतील त्यांच्या प्रतिमा आपण स्मृतीकडून प्रवर्तकशक्तीचे ( इच्छाशक्तीचे ) मदतीने मनासमोर हजर करितो. नंतर मन त्या