पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६९)

काही सोप्या व चित्ताकर्षक गोष्टी सांगाव्या. काही गोष्टी कल्पित असल्या तरी हरकत नाही. मात्र ज्या गोष्टी सांगावयाच्या त्यांची योग्य निवडानिवड झाली पाहिजे, तरच उपयोग. आतां शाळांतील शिक्षणांत कल्पनाशक्तीस कसे वळण लावावें तें सांगतो.
 कल्पनाशक्तीचा अध्यापनाच्या कामी उपयोग व शि-क्षकांचे कर्तव्यः- सर्व तोंडी शिक्षणांत कल्पनाशक्तीचा एकसा-रखा विकास होत असतो. आपण जें सांगू त्याचे काल्पनिक चित्र मुलांच्या मनासमोर जर बरोबर उभे राहिले तरच मनाकडून त्याचे ग्रहण झाले असे समजावे. मुले जे जे सृष्टिचमत्कार पाहतात, त्यांविषयी त्यांची जिज्ञासा जागृत होते; व म्हणूनच त्यांविषयीं ती आपल्या आईबापांना प्रश्न करितात. पाऊस, ढग, फुले, झाडे वगैरे वस्तु काय आहेत, कशा झाल्या, कोणी केल्या, अशासारखे प्रश्न पुष्कळ मुलें करितात; व जी आईबापें या प्रश्नांची योग्य उत्तरें देऊन आपल्या मुलांची जिज्ञासा तृप्त करितात ती मुलांच्या कल्पनाशक्तीस जागृत करितात. शाळांतून जे निरनिराळे विषय शिकविले जातात त्यांपैकी इतिहास, भूगोल व वाङ्मय या विषयांत कल्पनाशक्तीस विशेष शिक्षण मिळते; इतर विषयांतहि थोडेबहुत मिळतेंच.इतिहास शिकवितांना पहिली महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की, विषयाची मांडणी बरोबर असली पाहिजे. जी भाषा वापरावयाची ती सरळ, परिचित, साधी परंतु जोरदार असून मुलांना सुबोध असली पाहिजे. कोणत्याहि शब्दाच्या अर्थाविषयी मुलांचे मनांत शंका येता कामा नये. असे केल्याने कल्पनाशक्ति जागृत होऊन योग्य त-हेनें विकास पावते. दुसरी महत्त्वाची गोष्ट शिक्षकांनी ध्यानात ठेवावयाची ती ही की, ऐतिहासिक गोष्टींचें वर्णन करितांना मुलांना ज्या गोष्टी अवगत असतील त्यांचा उपयोग करावयाचा. मुलांच्या मनांत ज्या कल्पना असतील त्यांशी नवीन कल्पनांची सांगड घालून दिली पाहिजे, तरच त्या नीट त्यांच्या मनांत ठसतील. कल्पनाशक्तीचे स्वरूप लक्षात आणून त्याप्रमाणे पाठ तयार केला पाहिजे. आपणांस जें जें म्हणून ज्ञान