पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)

काय काय गोष्टी येतात, त्यास कोणत्या त-हेच्या यातना भोगाव्या लागतात, याची कल्पना ज्या मुलास बरोबर होईल त्यासच अशा माणसाबद्दल सहानुभूति वाटेल व त्यास मदत करण्याची इच्छा होईल.
 वर कल्पनाशक्तीचे दोन प्रकार सांगितले आहेत. लहान मुलांची कल्पनाशक्ति दुसऱ्या प्रकारची असते. तीवर भावनांचा दाब असतो. मनोरंजन करणे हेच काय ते तिचे काम, मग त्यापासून काही तात्त्विक ज्ञान होवो अगर न होवो.
 लहान मुलांना नवीन गोष्टी ऐकण्याची मोठी हौस असते, इतकेंच नव्हे तर तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकण्याची त्यांची इच्छा असते. याचे कारण त्या गोष्टीच्या काल्पनिक प्रतिमेपासून मनास होणारा एक प्रकारचा आल्हाद हे होय. एखाद्या लहान मुलास आपण चारदोन गोष्टी सांगाव्या, मग त्या अगदी भिकार चिमणीकावळ्याच्या गोष्टींसारख्या का असेनात, व त्याच त्याच गोष्टी लागोपाठ काही दिवस सांगाव्यात व नंतर एखादे दिवशी त्या मुलास ' तूंच गोष्ट सांग ' असें म्हणावे, म्हणजे मूल गोष्ट सांगू लागतें, व ती सांगतांना तींत आपली स्वतांचीच काहीतरी भर टाकिते, असे आढळून येईल. यावरून मुलांची कल्पनाशाक्ती केवळ ग्राहक व्यापार करणारी नसून काहीतरी बौद्विक द्रव्यहि निर्माण करीत असते असे दिसते. मुलें साधारण तीनचार वर्षांची झाली की, त्यांचे कल्पनाशक्तीचे व्यापार आपल्या नजरेस येऊ लागतात; मुले खेळत असतांना आपण चोरून पहावे, म्हणजे त्यांची कल्पनाशक्ति कशा प्रकारची असते ते समजेल. निर्जीव पदार्थ सजीव आहेत असे मानून मुले त्याप्रमाणे त्यांशी आपले वर्तन ठेवितात; लहान लहान खडे एखादे फळीवर ठेवून मुले त्यांची पूजाअची करितात; काठी घोडा आहे असे समजून तीस दाणापाणी करितात; बाहुली जिवंत आहे असें समजून तीस जेवणखाण, अंघोळ, कपडे घालितात, दबावतात.चोपतात, पुन्हा जवळ घेतात व कुरवाळतात. खेळतांना मुलें