पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६४)

ळख व्हावयास पाहिजे; ही ओळख प्रत्यक्ष नेत्राने होणे शक्य नाही.अशा स्थितीत आपणांस पर्वत एखाद्या मोठ्या डोंगरासारखा असतो, एवढें ज्ञान जर कोणी करून दिले, तर कार्यभाग होतो. त्याचप्रमाणे एक भले मोठे तळे म्हणजे सरोवर, एवढे जरी आपणांस कोणी सांगितले तरी सरोवराची प्रतिमा मनासमोर येते; व सरोवर प्रत्यक्ष पाहिल्याने मनावर ज्या त-हेचा ठसा उमटेल, तशाच प्रकारचा जवळ जवळ ठसा मनावर उमटतो. अशा पुष्कळ गोष्टी असतात की, त्या प्रत्यक्ष पाहणे अशक्य असते; व जरी कदाचित् शक्य असले तरी, या कामी, पुष्कळ वेळेचा व द्रव्याचा अपव्यय करणे भाग पडते. एवढी गोष्ट मनासमोर ठेविली म्हणजे कल्पनाशक्तीचे महत्त्व काय आहे ते समजेल.
 कल्पनाशक्तीच्या व्यापाराचे पृथक्करण केले म्हणजे, आपणांस त्याचे तीनचार घटकावयव आहेत असे आढळून येईल. प्रथम ज्या वस्तूचें अगर गोष्टीचे काल्पनिक चित्र मनासमोर कल्पनाशक्तीचे साहाय्याने आणावयाचे असेल, त्याची अंधुक प्रतिमा आपोआपमनासमोर उभी राहाते. हा मनाचा धर्मच आहे. हीच प्रतिमा कोरून साफ करून स्पष्ट दिसेल अशी करणे हेच कल्पनाशक्तीचे काम होय. असली अंधुक प्रतिमा मनासमोर दिसली की, ती स्पष्ट करग्यास काय पाहिजे, काय नको, ते मिळविण्याचे कामी मन लागते.मनासमोर कित्येक निरनिराळ्या प्रतिमा स्मृति हजर करिते. यांपैकी ज्या प्रतिमा पाहिजे असतील त्यांची निवडानिवड होते व ज्या नको असतील त्या मन फेंकून देते, व नंतर निवड केलेल्या प्रतिमांची,मनासमोर असलेल्या अंधुक प्रतिमेशी, ज्यायोगें ती स्पष्ट दिसू लागेल अशी मन सांगड घालितें, व शेवटी इष्ट गोष्ट साध्य झाली याजबद्दल मनास समाधान होते. इतक्या सर्व गोष्टी नुसत्या एका कल्पनाशक्तीचे व्यापारांत होतात. कल्पनाशक्तीची दोन भिन्न स्वरुपं दृष्टोत्पत्तीस येतात. त्यांपैकी एक अगदी साधे असते व दुसरेंथोडें गहन असते. दुसऱ्यांच्या कल्पनांचे काल्पनिक ग्रहण करणे, हे