पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६३)

असल्यास, प्रथम कापूस उत्तम त-हेचा पाहिजे; नंतर त्यापासून सूत काढण्याकरितां उत्तम यंत्रसामुग्री व कुशल कारागीर पाहिजेत; व हे सूत विणून बळकट व सफाईदार कपडा बनविण्यास लागणारी साधनेंहि सर्व उपलब्ध पाहिजेत, तरच चांगला कपडा तयार करितां येईल. अशीच स्थिति उच्च मनोव्यापारांची आहे. मन हा एक मोठा कारखाना आहे. या कारखान्यांत भली मोठी घडामोड एकसारखी होत असते. या कारखान्यांत चालणाऱ्या सर्व कामांवर देखरेख करण्याचे काम अवधानाकडे सोपविले आहे. ज्ञानेंद्रियांकडून येणारा कच्चा माल नीट तपासून घेतला जातो; व तो सांठवून ठेवण्याचे काम व पुढे लागेल तसतसा देण्याचे काम स्मरणशक्तीकडे सोपविलें असतें. स्मरणशक्ति जर सर्व माल नीट व्यवस्थेशीर ठेवील तरच पुढे वेळेवर त्या मालाची गरज लागली की तो मिळेल. स्मरणशक्तीस आपण कोठवळा समजूं. कोठवळ्याकडून लागेल तो माल घेऊन त्यापासून हरएक चिजा बनविणे हेच कल्पनाशक्तीचें काम होय. कल्पनाशक्तीचे काम नीट व्हावयाचे असल्यास प्रवर्तकशक्तीची (इच्छाशक्तीची ) मदत पाहिजे. आपणांस ज्या वस्तूंचें म्हणून ज्ञान होतें, ( मग ते कोणत्याहि इंद्रियद्वारे होवो ),त्या सर्वांच्या प्रतिमा मनावर उमटतात. या प्रतिमांपासूनच कल्पनाशक्ति अगदी नवीन भिन्न त-हेच्या प्रतिमा बनविते; मात्र या कामाकरिता लागणारी सामुग्री वेळेवर मिळाली पाहिजे. हेच काम प्रवर्तकशक्ति (इच्छाशक्ति) करिते. कल्पनाशक्ति काही नवीन जिन्नस निर्माण करिते अशांतला प्रकार नाही. आपल्या मनांत ज्या काही कल्पना ( वस्तूंच्या प्रतिमा ) असतील, त्यांची एक तऱ्हेची सांगड घालिते व जणूं काय आपणांस पूर्वी कधीहि माहीत नसलेली नवीच चीज बनविते.
 कल्पनाशक्तीचे काम कोणत्या त-हेचे आहे हे नीट समजावे म्हणून आपण एक दोन उदाहरण घेऊ. समजा की, आपण पर्वत अगर सरोवर यांपैकी काहींच कधीहि पाहिले नाही. परंतु टेकडी, डोंगर, तळे वगैरे पाहिलेली आहेत. आता पर्वताची आपणांस ओ-