पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

णत्या गोष्टी मुलांकडून तोंडपाठ करून घ्याव्या व त्या का घ्याव्या हे थोडक्यात सांगितले पाहिजे. ज्या क्रियेस आपण घोंकणें अगर तोंडपाठ करणे असे म्हणतो, तिचा समावेश सांनिध्यसाहचर्याचेच वर्गात होतो. सादृश्यसाहचर्याने ज्या गोष्टी मनांत ठसूं शकतात त्या पाठ करण्याचे कारणच पडत नाही.
 अंकगणित, बीजगणित, भूमिति, महत्त्वमापन, यांतील काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात, त्याशिवाय चालत नाही. त्यांचा आपणांस पावलोपावली उपयोग होतो. उदाहरणार्थः-पाडे, पावकी, निमकी वगैरे. कांही कोष्टके म्हणजे ज्यांचा एकसारखा व्यवहारांत उपयोग होतो अशी; (अ ∓ ब) तसेच (अ ∓ ब) अशासारखे बीजगणितांतील भाग, भूमितीतील व्याख्या, प्रत्यक्षप्रमाणे वगैरे; कांहींकांही गोष्टींतील शब्दच महत्त्वाचे असतात; व तेच यावे लागतात. भूमितींतील व्याख्या वगैरे याच वर्गातील होत. एखाद्या वर्तुळाचा व्यास दिला असतां घेर कसा काढावा वगैरे महत्त्वमापनांतील पुष्कळ गोष्टी पाठ करवाव्या लागतात. कविता, कांही म्हणी, काही ग्रंथांतील निवडक वाक्यसमूह, अशासारख्या गोष्टी पाठच कराव्या; कारण यांतील विचार व भाषा अशीच असते की, दुसऱ्या शब्दांनी त्यांतील मर्म व्यक्त करितांच येत नाही; मोरोपंतासारख्या अगर कालिदासासारख्या कवींच्या शब्दांतच काय तो खुबी असते. इतिहासांत जर कोणत्या गोष्टी पाठ करण्यासारख्या असतील तर ते सन होत; व कांहीं कांहीं तहांची व सनदांची कलमें. महत्त्वाचे जेवढे सन असतील तेवढेच मुलांकडून पाठ करवावे:- विशेषेकरून ज्या सनांत मोठ्याच कांहीतरी घडामोडी झालेल्या असतील ते; उदाहरणार्थ पानिपत, प्लासी, बक्सार, यांसारख्या लढायांचे सन.
 पुष्कळ शिक्षकांची अशी समजूत असते की, मुलांकडून भूगोल हा विषय चांगला तयार करून घ्यावयाचा असल्यास त्यास एकच उपाय आहे; तो कोणता म्हणाल तर-घोकंपट्टी; पण भूगोल शिकवितांना शाब्दिकत्सरणशक्तीवर होता होईल तो अगदी कमी ताण