पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५९)

ज्या गोष्टी शिकवावयाच्या त्याचें जेथे जेथे म्हणून शक्य असेल तेथें तेथें योग्य वर्गीकरण करावे. शिक्षक काय किंवा एखादा व्याख्याता काय, त्याचे मुख्य कसब विषयाची मांडणी करण्यांत दिसून येते. आणखीहि एक महत्त्वाची गोष्ट शिक्षकाने ध्यानात ठेविली पाहिजे; ती ही की, कोणताहि विषय शिकवितांना घाई करूं नये. कोणतीहि गोष्ट एकदम मुलांच्या ध्यानात ठसत नसते. स्मरणशक्तीस तरी आपले काम करण्यास काहीतरी वेळ लागावयाचा; व हा जर दिला नाही तर ती मुळीच ऐकणार नाही व आपल्या कह्यांतहि ती मुळींच राहणार नाही. समजा की, आपणांस 'अकबर बादशाहा संबंधी माहिती मुलांस सांगावयाची आहे. आतां विषयाची मांडणी कशी करावी, म्हणजे स्मरणशक्तीवर अगदी थोडा ताण बसेल, व ज्ञानप्राप्ति तर बरीच होईल, हे पाहूं. या विषयाची मांडणी खाली दाखविल्याप्रमाणे करावी म्हणजे आपले कार्य होईल.
 (१) चांगला राजा कोणास म्हणावें हे प्रथम मुलांकडून काढून घ्यावें अगर सांगावे. नंतर अकबर बादशाहास चांगला का म्हणतात तें सांगावें.
 (२) अकवर राज्यारूढ झाला त्या वेळची परिस्थिति, त्याचे मनांतील हेतु व तदनुरूप त्याचे राज्य चालविण्याचे धोरण वगैरे बद्दल नंतर सांगावें.
 (३) त्याने लोककल्याणार्थ केलेल्या गोष्टी-धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, कर कमी करणे वगैरे; व यामुळेच प्रजा संतुष्ट होती.
 (४) राज्यविस्तार व तो कसकसा केला. यासंबंधी अकबर राज्यावर आला त्यावेळी त्याचे राज्य केवढे होते व तो मेला त्यावेळी केवढे होते एवढेच सांगावे. अमुक लढाई कोणते सनांत झाली, या बाजूस किती सैन्य होते, त्या बाजूस किती होतें, वगैरेबद्दल मुलांस फारसा त्रास देऊ नये.
 (५) त्याचा स्वभाव व त्यांतील गुणदोष.
हा भाग पुरा करण्यापूर्वी निरनिराळ्या विषयांतील कोणको-