पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

आपल्या मनांत असलेल्या कल्पनेशी अगर गोष्टीशी या गोष्टीचा कांहींतरी संबंध असतो. हा संबंध नुसत्या सांनिध्याचा असेल अगर सादृश्याचा असेल.सांनिध्यसाहचर्य शिक्षणदृष्टया फारसे महत्त्वाचे नाही. कारण त्यांत फारसा तथ्यांश नाही. या साहचर्यामुळे उच्च मानसिक व्यापारांस कांहींएक मदत होत नाही. परंतु सादृश्यसाहचर्य मात्र शिक्षणदृष्टया फार महत्त्वाचे आहे. याच्यामुळे उच्च मानसिकशक्ति जागृत होतात, इतकेच नव्हे तर, सर्व मनांत एक प्रकारचा जोम येतो. भाषाविषय शिकवितांना सांनिध्यसाहचर्याचा उपयोग करावा लागतो. परंतु शास्त्रीय विषय शिकविण्यांत शिक्षकांस सादृश्यसाहचर्याचा एकसारखा उपयोग करावा लागतो; त्यावांचून चालतच नाही. या दृष्टीने पाहिले म्हणजे शास्त्रीय विषयांचे भाषाविषयांपेक्षा अधिक महत्त्व आहे, असे दिसून येईल. शाळेतील निरनिराळे विषय शिकवितांना वर सांगितलेल्या दोन प्रकारच्या साहचर्यांचा नेहमी एकसारखा उपयोग होत असतो. प्रथम सांनिध्यसाहचर्याची काही उदाहरणे देऊ.
 (१) वस्तुपाठ शिकवितांना पदार्थ व त्याचे नांव व गुणधर्म यांमधील साहचर्य मुलांच्या मनांत बिंबवावे लागते. पदार्थ व त्याचें नांव यांमध्ये खरोखर काहीच संबंध नसतो.
 (२) शिक्षकाने काहीएक आज्ञासूचक शब्द उच्चारिला की, त्याप्रमाणे मुलांनी ताबडतोब वागणे. ' पाट्या घ्या, ' हे शब्द उच्चारतांच मुले पाट्या घेतात; म्हणजे हे शब्द व पाट्या घेण्याची क्रिया एकामागून एक होतात. या दोन क्रियांत कालसांनिध्य असते.
 (३) उजळणीचे धडे म्हणतांना सांनिध्यसाहचर्याचाच उपयोग होत असतो. मुलांना पाडे अगर पावकों, निमकी यांपैकी कोणतें तरी एक नुकतेच शिकवून झाले म्हणजे जर आपण ' सहापंचे किती अगर 'बारा पाव किती' अशासारखे प्रश्न केले तर त्यांना बरोबर उत्तर देतां येत नाही. तें उत्तर देण्याकरितां मुलें पहिल्या