पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५६)

पाठ शिकवितांना प्रथम मुलांच्या समोर वस्तु ठेवावी व तिचे मुलांकडून नीट शक्य तितक्या इंद्रियद्वारे निरीक्षण करवावें; व नंतर ती वस्तु दृष्टीआड करून, जे काही मुलांनी पाहिले असेल तें शब्दांनी त्यांना सांगावयास लावावे. जरूर वाटल्यास शिक्षकानें मधून मधून योग्य प्रश्नहि करावे. लहानपणी म्हणजे पहिल्या आठ नऊ वर्षांत मुलांच्या मनांत बौद्धिक गोष्टींचा (कल्पना, शब्द यांचा) सांठा फारच थोडा असतो. हा सांठा जसजसा जास्त होत जातो तसतशी स्मरणशक्तीची वाढ शब्दद्वारें करितां येते. स्मरणशक्तीस शिक्षण देतांना शिक्षकाने उत्तम स्मरणशक्तीस अवश्य लागणारे गुणधर्म कोणते, ते लक्षांत बाळगावे. असे केल्याने उद्दिष्ट हेतु साध्य करण्याकरितां योग्य तेच उपाय योजिले जाऊन कार्यभाग होईल.
हे गुणधर्म तीन आहेत, ते येणेप्रमाणे:-
 (१) कोणत्याहि विषयाकडे मन लावितां येणें व तेणेकरून त्या विषयाची माहिती करून घेणे.
 (२) अशा रीतीने मिळविलेली माहिती अगर ज्ञान मनांत घट्ट राहाणे (पक्की धारणा ).
 (३) मनांत ज्या ज्ञानाचा संचय होऊन राहिला असेल तें वाटेल त्यावेळी फारसा यत्न न करितां मनाच्या समोर आणितां येणे ( सुलभ व त्वरित स्मृति ).
 आणखी एक गोष्ट सांगावयाची राहिली, ती हीः-आपण जे काहीवाचतों, शिकतों व ऐकतो, त्याचे दिवसांतून थोडा वेळ जरी मनन केले तरी त्याचा ठसा मनांत पक्का राहतो. एखादे गोष्टीची पुनरावृत्ति दहापांच वेळां केल्याने जे काम होते ते एकदोन वेळां मनन केल्याने होते. असो. येथवर शिक्षकाने मुलांचे स्मरणशक्तीस योग्य वळण कसे लावावे यासंबंधी काही सामान्य गोष्टी सांगितल्या. आता यांपैकी एकदोन गोष्टींचे थोडे सविस्तर विवेचन करूं.यांपैकी पहिली गोष्ट म्हटली म्हणजे वर सांगितलेल्या साहचर्यनियमांचा शिक्षकांस कसा व केव्हां उपयोग करितां येईल ही होय.
 एखादी गोष्ट आपणांस आठवते, ती कां आठवावी याचा जर आपण थोडासा विचार केला, तर आपणांस असे आढळून येईल की,