पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५१)

सारखी नसते. काही माणसें एकपाठी असतात; म्हणजे एखादी गोष्ट फक्त एकच वेळ ऐकल्याने किंवा पाहिल्याने अगर उच्चारिल्याने ती त्यांच्या ध्यानांत राहते. कित्येकांना तीच गोष्ट ध्यानांत राहण्यास पांचसहा वेळां पुनरावृत्ति करावी लागते. अशा प्रकारचा जो फरक दृष्टोत्पत्तीस येतो तो सामान्य स्मरणशक्तींतील कमजास्त तविपणाचा परिणाम होय. काही विवक्षित इंद्रियद्वारे होणारे संस्कारच मनांत चांगले साठविता येतात व त्यांचीच पुढे काही कालाने पक्की स्मृति राहते, असा जो प्रकार आपण पुष्कळ वेळां पाहतो तो सर्व विशेष-स्मृतीचा व्यापार होय. अशा स्थितीत स्मरणशक्तीची गति कांही विवक्षित दिशांकडेसच असते.
 कित्येक माणसांना स्वभावतांच गाणे आवडते. अशी पुष्कळ माणसे आपल्या पहाण्यांत आली असतीलच की, जी एखादें साधे पद एकदोन वेळा ऐकले की बरोबर चालींत म्हणतात. काही माणसें अशी असतात की, त्यांना एखाद्या स्थलाची अगर माणसाची पक्की आठवण राहते. कित्येक माणसांना एखाद्या ऐकलेल्या गोष्टीची जशी आठवण राहते तशी वाचलेल्याची अगर पाहिलेल्या गोष्टीची राहत नाही. हा जो फरक पुष्कळ वेळां आपले पाहण्यांत येतो तो मुख्यतः दोन कारणांमुळे होतो. (१) इंद्रियाची स्वाभाविक स्थिति, (२) शिक्षण-यांत परिस्थितीचा समावेश होतो.काही माणसें अशी आढळतात की, त्यांचे श्रवणेंद्रिय जितकें तीक्ष्ण असते तितके नेत्र तीक्ष्ण नसतात. अर्थात् अशा माणसांना ऐकिलेल्या गोष्टींची स्मृति चांगली राहते; अमुक एका इंद्रियद्वारे होणाऱ्या ज्ञानाची स्मृति चांगली राहते, अमुक एकाची तशी राहत नाही असा जरी ठाम नियम आपणांस ठरविता येणार नाही तथापि येवढें मात्र एथे सांगता येईल की, ज्ञानदृष्ट्या ज्या इंद्रियाचे महत्त्व अधिक त्याच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानाचा ठसा इतर इंद्रियद्वारे होणाऱ्या ठशांपेक्षां मनावर जास्त खोल व स्पष्ट उमटतो. नेत्रद्वारे होणाऱ्या ज्ञानाचा ठसा सर्वात जोरदार असतो. अर्थात् त्याची स्मृति तशाच प्रकारची राहते. याचे खालोखाल श्रवणेंद्रियद्वारे