पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)

एकसारखा उपयोग होत असतो. काहींकांही गोष्टीत कार्य-कारणभाव-संबध असतो. सबव कारण आठवतांच कार्य आठवते किंवा कार्य आठवतांच कारण आठवते. आकाश मेघाच्छादित दिसलें की पाऊस पडणार ही कल्पना मनांत येते. उलट एखादे वेळी रात्रों निजून उठल्या नंतर रस्ते व आंगण ओली झालेली दिसतात व हे दिसतांच 'पाऊस पडला' ही कल्पना मनासमोर साहजिकच येते. या साहचर्यास कार्यकारणसाहचर्य म्हणतात. आणखीहि साहचर्याचे काही प्रकार आहेत उदाहरणार्थ-एखादी कविता अगर पद म्हणू लागतांच एक चरण आठवला की, दुसरा पुढील चरण आठवतो. असे का व्हावे याचा जर आपण विचार केला तर विचाराअंती आपणांस असे आढळून येईल की, केवळ सांनिध्यामुळे हे सर्व होते.वर साहचर्याचे एकंदर चार प्रकार सांगितले आहेत ते येणेप्रमाणे.
 (१) वस्तुसाहचर्य.
 (२) स्थलसाहचर्य.
 (३) शाब्दिक साहचर्य.
 (४) कार्यकारणसाहचर्य.
 या सर्वांचा समावेश सांनिध्यसाहचर्य या एका शब्दांत होतो; मग हे सानिध्य स्थलसंबंधी अतो किंवा कालसंबंधी असो.
 सांनिध्यसाहचर्याचे नियमः-
 ज्या गोष्टी ( कल्पना विचार वगैरे ) एके कालींच घडून येतात अगर एका मागून एक घडून येतात, त्यांपैकी पुढे कांहीं कालानंतर एखाद्या गोष्टीची स्मृति होतांच तिशी संबंध असलेल्या दुसऱ्या गोष्टींचीहि स्मृति होते.

 आपल्या बहुतेकांच्या अनुभवास ही गोष्ट आली असेलच की, पुष्कळ वेळां एखादी वस्तु पाहिली की त्या वस्तूसारख्या दुसऱ्या वस्तूंची आपणांस आठवण होते; केव्हां केव्हां एखादा अपरिचित माणूस पाहिला की पूर्वी कधीतरी पाहिलेल्या दुसऱ्या एखाद्या माणसाची स्मृति होते. हा सर्व प्रकार सादृश्यसाहचर्यामुळे होतो.