पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४७)

मनावर काहीच ठसा उमटत नाही. अशी स्थिति जेव्हां मनास शैथिल्य अगर थकवा आलेला असतो तेव्हां होते. पण मन जेव्हां तरतरीत असेल तेव्हां मात्र त्यावर काही कार्य झालें कीं लगेच प्रतिकार्य होते. व ज्या वस्तूचे कार्य होते तिचा चांगला बोध होतो. अर्थात् त्या वस्तूची स्मृतिहि पुढे त्वरित होते. आतां आपण साहचर्य म्हणजे काय व त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहूं.
 आपले मनांत कोणतीहि कल्पना एकटी सांपडत नाही. तिचे बरोबर नेहमी तिचे इष्टमित्र असतातच. यासच साहचर्य म्हणतात. याच्या स्पष्टीकरणार्थ आपण काही उदाहरणे घेऊ. (१)पदार्थ व त्यांचे गुणधर्म यांचे नेहमी साहचर्य असते. म्हणून एखाद्या पदार्थाची आठवण झाली की त्याबरोबरच त्या पदार्थाचे विशिष्ट गुणधर्माचीहि आठवण होते. साखरेची कल्पना मनांत येतांच तिच्या गोडीची व रंगाची कल्पना मनासमोर उभी राहाते; तसेंच कांचेची कल्पना मनासमोर येतांच तिच्या बरोबर पारदर्शकपणाचीहि येते. असल्या प्रकारच्या साहचर्यास आपण वस्तुसाहचर्य म्हणूं. आपण ज्या निरनिराळ्या वस्तु पाहतो त्यांची आठवण व त्यांमधील भेद आपल्या मनांत ठसण्याची मुख्य कारणे त्या वस्तूंच्या गुणधर्माचें त्या वस्तूशी साहचर्य हे होय.(२) शाळेची आठवण झाली की, तिच्याबरोबर अभ्यास, शिक्षक, सहाध्यायी मुले वगैरेची आठवण होतेच. त्याप्रमाणेच स्वयंपाकघर, वाचनालय, तुरुंग, दवाखाना, कचेरी वगैरेसारख्या स्थळांची कल्पना मनासमोर येतांच त्यांशी ज्या गोष्टींचे साहचर्य असते त्यांचीहि आठवण होते. अशा प्रकारच्या साहचर्यास स्थलसाहचर्य म्हणूं. आणखीहि एक साहचर्याचा प्रकार आहे. त्यास आपण शाब्दिक साहचर्य हे नांव देऊ कोणताहि शब्द ऐकल्याबरोबर त्या शब्दाने दर्शविलेल्या वस्तूचें अगर कल्पनेचे चित्र मनासमोर उभे राहिले तरच त्या शब्दाचा बरोबर बोध झाला असें म्हणता येईल. शाळांतील शिक्षणांत याच प्रकारच्या साहचर्याचा