पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४६)

साहचर्याने फारच त्वरित आठवतात. एखाद्या माणसाचें नांव आपणांस पुष्कळदा प्रथम आठवत नाही. परंतु तो माणूस कोठे कोठे कोणाबरोबर पाहिला हे मात्र लवकर आठवतें. यावरून आपल्या असें ध्यानात येईल की, कोणत्याहि वस्तूचें अगर गोष्टीचे स्मरण होणें न होणे हे मुख्यतः पुढे दिलेल्या गोष्टींवर अवलंबून असतें:-
 (१) इंद्रियद्वारे मनावर पूर्वी उमटलेला ठसा व (२) साहचर्य. कोणत्याहि गोष्टीचा अगर वस्तूचा इंद्रियद्वारें बोध झाला म्हणजे मनावर जो ठसा उमटतो तो जितका खोल व स्पष्ट असेल त्या मानाने त्या गोष्टींचे अगर वस्तूचे पुढे स्मरण होणार हे वर सांगितलेच आहे. हा ठसा स्पष्ट अगर अस्पष्ट उमटणे हे मुख्यतः (१) मनावर होणाऱ्या संस्काराचा जोर, (२) त्याची वरचेवर पुनरावृत्ति व (३) तत्कालीन मनाचा तरतरीतपणा अगर शैथिल्य यांवर अवलंबून असते, हेहि वर लिहिलेल्या वर्णनावरून ध्वनित होते. आपण एखादी वस्तु प्रत्यक्ष पाहिली असतां तीमुळे जसा मनावर जोरदार संस्कार होतो तसा त्या वस्तूचें नुसते वर्णन ऐकल्याने होत नाही. याचे कारण नेत्र व कर्ण या इंद्रियांत असलेला स्वाभाविक फरक. त्याचप्रमाणे कोणत्याहि गोष्टीच्या पुनरावृत्तीने मनावर चांगला खोल व स्पष्ट ठसा उमटतो व म्हणूनच त्या गोष्टीचे स्मरण त्वरित व सुलभ रीतीने होतें, असे जरी वर सांगितले आहे तरी वरचेवर पुनरावृत्ति केल्याने जसा उपयोग होतो तसा नुसती पुनरावृत्ति पुष्कळ वेळां केल्याने होत नाही, एवढे मात्र या ठिकाणी सांगणे अवश्य आहे. केव्हां केव्हां पूर्वसंस्काराची पुनरावृत्ति होणे शक्यच नसते. अशा स्थितीत त्या संस्काराच्या प्रतिमेची पुनरावृत्ति केल्याने भागते. अगदी प्रथमचा संस्कार मनावर झाल्यापासून त्याची पुनरावृत्ति जितकी लवकर होईल तितके चांगले. आपल्या मनावर जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे अगर वस्तूमुळे काहीतरी कार्य होते त्यावेळी मनाचे जर प्रतिकार्य झाले नाही तर त्यापासून काहीच उपयोग होत नाही, म्हणजे