पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४४)

असेल तर त्या पदार्थाचे आपण नीट शक्य तितक्या इंद्रियद्वारे निरीक्षण करावें व जितके वेळां निरीक्षण करितां यईल तितकें करावें; व जितकें वरचेवर निरीक्षण करणे शक्य असेल तितकें करावे. असे केल्याने मनावर उमटणारा ठसा स्पष्ट व कायम राहील, व मनास वाटेल त्यावेळी या पदार्थाची प्रतिमा या ठशांतून काहून मनाच्या समोर आणितां येईल.
 स्मरणशक्तीच्या साहाय्याने आपल्या इंद्रियांसमोर जे नसेल पण ज्याचे ज्ञान इंद्रियद्वारे पूर्वी कधीतरी झाले असेल, त्याची प्रतिमा मनापुढे आपणांस आणिता येते. कोणत्याहि वस्तूची प्रतिमा त्या वस्तूइतकी स्पष्ट व पूर्ण असणे अशक्यच आहे. तथापि पुष्कळ वेळां असल्या अस्पष्ट प्रतिमेच्या मदतीनेच आपले कार्य होते. अवधान व स्मरणशक्ति ह्या मनाच्या ठायी असलेल्या दोन शक्तीमुळेच आपले सर्व मनोव्यापार चालतात. स्मरणशक्ति ही एक स्वतंत्र मानसिक शक्ति आहे असे समजण्यापेक्षा ही एक अवधानशक्तीप्रमाणे मनाची सामान्य स्थिति आहे असे समजणे अधिक सयुक्तिक दिसते.

 स्मरणशक्ति आपले काम कसें करिते हे नीट ध्यानात यावें म्हणून ही शक्ति एक फोनोग्राफ ( गाणारे यंत्र ) आहे अशी कल्पना करूं. फोनोग्राफ यंत्र आता बहुतेकांना माहीत झाले आहेच. या यंत्रांत आपणांस एखाद्याचे पद अगर भाषण घालून ठेवितां येते व आपल्या इच्छेस वाटेल तेव्हां या यंत्राकडून ते पद अगर भाषण म्हणविता येते. अशाचसारखा व्यापार स्मरणशक्ति करिते, हे स्मरणशक्तीच्या वर्णनावरून सहज ध्यानात येण्यासारखे आहे. आपले मन मेणासारखे आहे. ज्ञानेंद्रियांवर काहीतरी आघात झाला की, त्यांच्या द्वारे तो मनावर होतो, हे पूर्वी सांगितलेच आहे. या आघातामुळे मनावर उमटणारा ठसा विवक्षित त-हेचाच असतो. हा ठसा जितका खोल उमटेल त्या मानानें तो कमजास्त काळपावेतो टिकणार. कित्येकवेळी हा ठसा उमटतो न उमटतो अशी स्थिति होते.