पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४१)

कागद कातरून फुलें, होड्या, डबे वगैरे बनविणे; अशासारख्या खेळांनी साहजिकच या वर सांगितलेल्या निरनिराळ्या वस्तूंच्या आकारांचे ज्ञान पक्के होते. व ते अगदी सुलभ रीतीनें होतें. मुलांना आपण खेळतच आहों असे वाटते व खेळता खेळतां त्यांच्या इंद्रियांना एकप्रकारचे शिक्षण मिळतें. पदार्थांच्या आकारांचे ज्ञान चित्रकला या विषयाने बरेच होते. वस्तुपाठ शिकवितांना मुलांना पदार्थ दाखवावा व त्याचे नीट निरीक्षण करावयास सांगावें. हैं निरीक्षण बरोबर झालें अगर नाही हे पाहण्यासाठी जो पदार्थ दाखविला असेल त्याचे चित्र काढावयास सांगावें. हल्ली शाळांतून चित्रकला हा विषय शिकविला जातो. परंतु हा विषय ज्या त-हेनें शिकविला जातो तीपासून फारसा फायदा होत नाही. आपले काम चित्रकला ही कला शिकवावयाची असें शिक्षक समजतात.चित्रकला हा विषय शाळांतून शिकविण्याचा. खरा उद्देश उत्तम चित्रे काढणारे कसबी लोक तयार करणे हा नाही, तर मुलांनी एखादी वस्तु पाहिली की तिचे साधारण चित्र त्यांना रेखाटतां यावे हा होय. त्यांना काटकोन, सरलरेषा, दीर्घवर्तुळ वगैरेचें ज्ञान नसले तरी चालेल. चित्रकला हा विषय अगदी लहानपणापासून शिकवावा. मात्र मुलांना प्रथम कावळा, चिमणी, मोर, दिवा, काठी, टोपी यांसारख्या त्यांच्या नेहमी पाहण्यांत येणाऱ्या वस्तु काढावयास लावाव्या. लेखन हा विषयहि चित्रकलेच्याच वर्गातील आहे. चित्रकला हा विषय शिकविल्याने जें शिक्षण देतां येतें तेंच हा विषय शिकविल्याने मिळतें. लेखन हा विषय चित्रकला या विषयाचाच पोटभाग आहे असे म्हटले तरी चालेल. आकाराचें ज्ञान करून देण्याच्या कामी भूगोलाचाहि थोडाबहुत उपयोग होतो. नेत्राच्या साहाय्याने पदार्थांचे अंतर कसे समजतें तें पूर्वीच सांगितले आहे. शाळांत मुलांना काही काही पदार्थांचे अंतर मोजावयास लावावें; टेबल, बांक, फळा वगैरे वस्तूंची लांबीरुंदी त्यांना मोजून दाखवावी व अशासारखें कांही शिकविल्यानंतर मुलांना अदमासाने वस्तूंचे अंतर सांगावयास लावावें; व नंतर ती जे सांगतात ते