पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)

ही--इद्रियांचा विकास ज्या क्रमाने होतो त्या क्रमाने शिक्षण दिले पाहिजे. सातआठ वर्षांच्या मुलांना शिकवितांना स्पर्शेद्रिय व नेत्र यांकडे शिक्षकाने विशेष लक्ष द्यावें. कोणताहि धडा शिकवितांना ज्या ज्या इंद्रियांचा उपयोग करणे शक्य असेल त्यांचा उपयोग करावा. असे केल्याने जे ज्ञान मिळेल तें मनांत बिंबेल. शिक्षणदृष्ट्या ज्या इंद्रियाचे महत्त्व ज्यास्त त्याजकडे जास्त लक्ष दिलें पाहिजे. एखादी वस्तु प्रत्यक्ष हातात घेऊन पाहिल्याने जितकी तिची आठवण राहते तितकी तिचे वर्णन ऐकल्याने राहत नाही. कोणतीहि वस्तु मुलांना दिसली की, ती पाहण्याची व हातांत घेण्याची मुलांना हौस असते. काही काही शिक्षक मुलांना याबद्दल रागें भरतात; त्यांना वाटते की, मुलांनी गप्प देवासारखें एके ठिकाणी बसून रहावें व सांगितलेले निमुटपणे ऐकावें, काही प्रश्न करूं नये, विचारूं नये. पण ही समजूत चुकीची आहे. मुलांना कधीहि स्वस्थ बसू देऊं नये. काहीतरी करावयास लावावें.
 आतापर्यंत इंद्रियशिक्षण देतांना शिक्षकानें कोणकोणत्या सामान्य गोष्टी लक्षात ठेवाव्या हे सांगितले. आतां विशेषेकरून नेत्र, स्पशेंद्रिय, कर्ण ही जी बौद्धिक इंद्रिये आहेत त्यांना शाळांत कसे शिक्षण देता येईल याबद्दल थोडेसें विवेचन करूं. बालोद्यान, वस्तुपाठ, वाचन, लेखन, गायन, चित्रकला या विषयांचा इंद्रियांशी विशेष संबंध यतो; व हेच विषय शिकवितांना इंद्रियांना शिक्षण मिळते.
 पदार्थाचा रंग, आकार, अंतर यांविषयींचे ज्ञान नेत्रद्वारे होते.बालोद्यान हे ज्ञान करून देण्याच्या कामी बरीच मदत करितें, इतकेच नव्हे तर या पद्धतीने रंग, रूप वगैरेचे ज्ञान अगदी सुलभ रीतीने होते. लहान मुलांकरितां फ्रोबेलने जे निरनिराळे खेळ काढिले आहेत त्यामुळे मुलांना पदार्थांचे रंग व आकार यांचें पक्के ज्ञान होते. निरनिराळ्या रंगांचे मणी ओवून त्यांच्या माळा तयार करण्याने रंगांचे चांगलेच ज्ञान होतें. नमुना पुढे ठेऊन त्याप्रमाणे लहान लहान खुर्च्या, टेबलें, चटया, टोपल्या, पेठ्या वगैरे तयार करणे; लहान लहान कमानी, पूल, देवळें अगर घरे बांधणे;