पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

वर सांगितले आहे तरी मुलांच्या आसपास असलेल्या वस्तु वगैरे एकसारख्या बदलू नयेत, हेहि या ठिकाणी सांगितले पाहिजे.
 आतां इंद्रियशिक्षण देतांना शिक्षकानें कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेविल्या पाहिजेत ते सांगतो. त्यांपैकी पहिली महत्त्वाची गोष्ट वस्तुसांनिध्य ही होय. पुष्कळ शिक्षक नुसत्या शब्दांवरच जोर देतात.त्यांना वाटते की, मुलांना शब्दास प्रतिशब्द देतां आला की,आपले काम झाले. शब्दांनी दर्शविलेल्या वस्तूंचे ज्ञान मुलांना आहे किंवा नाही हे ते मुळीच पाहात नाहीत. जेथे जेथे म्हणून शक्य असेल तेथे तेथें शिक्षकाने मुलांच्या समोर प्रत्यक्ष वस्तु ठेवावी व त्यांना त्या वस्तूचे नीट निरीक्षण करण्यास लावावे. वस्तु नच मिळाल्यास त्या वस्तूचा नमुना ( मातीचा अगर लाकडाचा तयार केलेला ) दाखवावा. हाहि नच मिळाल्यास चित्रांचा अगर तसबिरांचा उपयोग करावा. हल्ली प्राथमिक शाळांतून वस्तुपाठ हा विषय नुकताच सुरू केलेला आहे. मुलांना वस्तूंचे ज्ञान व्हावे, त्यांची निरीक्षणशक्ति वाढावी, त्यांच्या अंगीं चौकसपणा यावा, त्यांची इंद्रिये तरतरीत व्हावीत, याच उद्देशाने हा विषय शिकविला जातो. वस्तुपाठ शिकवितांना मुलांना वस्तु हातांत घेऊं द्यावी व त्या वस्तूचे ज्ञान ज्या ज्या इंद्रियद्वारे मिळणे शक्य असेल त्या त्या इंद्रियांचा उपयोग करावयास लागावें. आपणांस जें कांहीं येत असेल तें सर्व एकदा मुलांपुढे ओकून टाकिले म्हणजे वस्तुपाठ शिकवून झाला अशी पुष्कळ शिक्षकांची समजूत असते. परंतु ही समजूत चुकीची आहे. जी माहिती मुलांना स्वश्रमाने मिळवितां येणे शक्यच नसेल तीच शिक्षकाने सांगावी. वस्तुपाठ चालला असतां शिक्षकाने फक्त मार्गदर्शन काम करावयाचें; म्हणजे मुलांस ज्या जिनसा लागतील त्या त्याने पुढे करावयाच्या, पाठ सुलभ करावयाचा, कोठून आरंभ करावयाचा वगैरे सांगावयाचें; तात्पर्य, मुलांना मार्ग दाखवावयाचा व त्यांच्या निरीक्षणावर एक प्रकारची नजर ठेवावयाची हेच शिक्षकाचे काम होय. इंद्रियशिक्षण देतांना दुसरी महत्त्वाची गोष्ट शिक्षकाने ध्यानात ठेवावयाची ती