पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३५)

एखाद्या घंटेचा नाद ऐकू येतो, तेव्हां प्रथमचा व्यापार आपल्या कानांवर येऊन आदळणाऱ्या इतर नादांपासून या विवक्षित नादाचा भेद समजणे हा होय. हे ज्ञान होण्यास आपणांस आपल्या अवधानाचा सर्व जोर याच नादाच्या ठायीं द्यावा लागतो. यानंतर होणारा व्यापार, या नादाचे पूर्वी ऐकलेल्या नादाशी साम्य, हा होय. इतका व्यापार झाला म्हणजे संवेदनाचे पूर्ण ज्ञान झाले असें समजावें. आतां घंटानाद ऐकू आला इतकें ज्ञान जेव्हां आपणांस होते तेव्हां घंटेचा आकार वगैरेचहि ज्ञान त्याचवेळी होते. इतका सर्व व्यापार झाला म्हणजे पूर्ण बोध झाला असे समजावें.
 कोणत्याहि पदार्थाचे चांगले ज्ञान होण्यास आपणांस नेत्र, त्वचा व कर्ण या इंद्रियांची मदत पाहिजे, हे वर दिलेल्या उदाहरणावरून सहज ध्यानात येईल. फक्त एकाच इंद्रियाने काम होणार नाही. लहान मुलांची इंद्रियें तीक्ष्ण असतात. त्यांच्या ठिकाणी विचार वगैरे उच्च मनोव्यापार करण्याचे सामर्थ्य फारसे नसते. चारपांच महिन्याच्या मुलाच्या हातांत आपण एखादा पदार्थ दिल्यास तें मूल प्रथम तो पदार्थ पाहते, नंतर तोंडांत घालिते व तो भुईवर आपटते; तो फोडतां तोडतां येतो की नाही हे पाहते म्हणजे त्या पदार्थाचे ज्ञान जितक्या वाटांनी मिळविणे शक्य असेल तितक्या वाटांनी मिळविण्याविषयीं खटपट करिते, म्हणजेच त्या पदार्थाचें नीट निरीक्षण कारतें. असो. आतां आपण इंद्रियांचा विकास कोणत्या क्रमाने होत जातो हे पाहूं; व नंतर इंद्रियशिक्षण म्हणजे काय, त्यापासून फायदा काय वगैरे गोष्टींकडे वळू.
 इंद्रियविकास व त्याचा क्रमः-- मनोविकास मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असतो असें मागे सांगितले आहेच. त्यापैकी पहिली गोष्ट नैसर्गिक कल, व दुसरी परिस्थति. चिताऱ्याच्या मुलास रंग व आकार यांचे ज्ञान अगदी त्वरित होते. त्याच्या नेत्रांस जन्मतांच एक प्रकारचे वळण मिळालेले असते. तोच एखाद्या भिल्लासारख्या रानटी माणसाचा मुलगा घेतला तर त्याचे श्रोत्रेंद्रीय मूळचेंच तीक्ष्ण असते असे आढळते.आतां जन्मतांच या मुलांना समाजापासून