पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

गील भागांत सांगितले आहेच. तथापि हे नीट समजावे म्हणून आपण एक दोन उदाहरणे घेऊ
 (१) ' या टेबलावर एक चेंडू असलेला आपणांस दिसतो.' हा व्यापार दिसण्यांत अगदीच साधा दिसतो. परंतु तो थोडा गहन आहे, ही गोष्ट या व्यापाराचे पृथक्करण करून पाहिल्यास समजून येईल. प्रथम' आपणांस दिसतें' म्हणजे काय होते हे आपण पाहूं. ईथर म्हणून एक सर्वव्यापी अति सूक्ष्म प्रवाही पदार्थ आहे. या पदार्थातूनच नेहमी प्रकाशाच्या लाटा येतात असा समज आहे. ध्वनि ऐकू येण्यास ज्याप्रमाणे हवेची अवश्यकता लागते, ( वाताकर्षक यंत्राने एखाद्या मोठ्या रुंद काचेच्या भांड्यांतील हवा काढून टाकून जर त्यांत विद्युत् घंटा वाजविली तर ती ऐकू येत नाही, ) त्याप्रमाणे पदार्थ दिसण्यास ईथर या द्रव्याची जरूर लागते. जेव्हां आपणांस एखादा पदार्थ दिसतो तेव्हां त्या पदार्थावर पडलेल्या प्रकाशामुळे ईथरमध्ये लाटा उत्पन्न होतात. त्या आपले डोळ्यांतील ज्ञानतंतूंवर जाऊन आदळतात. त्यामुळे ज्ञानतंतु कंप पावू लागतात व नंतर मेंदूच्या द्वारें मनास दिसते' इतकें ज्ञान होते; म्हणजे नेत्रांस काही विकृति झाली हे मनास समजते. आपल्या मनाचा असा धर्म आहे की, संवेदन झाले की त्याचा संबंध मन काहीतरी बाह्य पदार्थाशी जोडते व म्हणूनच आपणांस दिसते हा व्यापार झाला की, त्याचे मागोमाग 'आपणांस काहीतरी दिसते,' अशासारखा व्यापार होतो. यानंतरचा जो व्यापार होतो तो ( प्रस्तुत उदाहरणांत )' कांहींतरी वाटोळा अमुक एका रंगाचा पदार्थ दिसतो ' हा होय. हा व्यापार 'ईथर' मधील लाटांत कमीजास्त वेग उत्पन्न झाल्यामुळे होतो. यामुळे अर्थात् ज्ञानतंतुहि कमीजास्त कंप पावू लागतात, व म्हणूनच मनावर उमटणारा ठसाहि काहीएक विवक्षित प्रकारचाच असतो. वर लिहिल्याप्रमाणे तीन व्यापार झाले की, जे ज्ञान मनास होते, त्यासारखे ज्ञान पूर्वी कधीकाळी झाले होते की काय, याबद्दल मन विचारपूस करितें व शेवटी मला चेंडू दिसतो हे ज्ञान मनास होते. या ठिकाणी जे मुख्य व्यापार झाले ते एणेप्रमाणे:-