पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८)

 संवेदनांचे मानसशास्त्रज्ञांनी दोन वर्ग केले आहेत, ते एणेप्रमाणे:-
१ विशिष्ट व २ सामान्य.
 भूक, तहान, थकवा ही सामान्य संवेदने होत. यांचा संबंध सर्व शरिराशी असतो. अमुक एकास्थली ही होतात असे म्हणता येत नाही.ही संवेदने सुखजनक अगर दुःखोत्पादक असतात. त्यांच्या साहाय्याने आपणांस बाह्यजगाविषयी काहीएक ज्ञान होत नाही.या संवेदनांचा संबंध अन्नपचन, श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण वगैरेशी असतो असें म्हटल्यास हरकत नाही. ही संवेदने एकमेकांपासून अगदी अलग करितां येत नाहीत; व यांचा विशेष संबंध शरिराविषयींचें ज्ञान देण्याच्या कामी येतो सबब यांस शरिराचेच नोकर समजावें.
 ज्यांस आपण विशिष्ट संवेदने हे नांव वर दिले आहे त्यांचा संबंध मुख्यत्वेकरून पांच ज्ञानेंद्रियांशीच असतो. या पांच ज्ञानेंद्रियांशी जोडलेल्या ज्ञानतंतूंवर काहीतरी आघात झाल्यामुळे ही संवेदने होतात. शरिराचे अमुक एका भागाशी यांचा संबंध आहे असें आपणांस सांगता येते; सबब या प्रकारच्या संवेदनांस विशिष्ट संवेदने असे म्हणण्यास हरकत नाही. ही संवेदने होण्यास काहीतरी बाह्य प्रेरणा व्हावी लागते.आपल्या सभोवार असलेल्या वस्तूंचे आपणांस ज्ञान होते ते याच प्रकाराने होते. या विशिष्ट संवेदनांचा मात्र मनाशी विशेष संबंध येतो, सबब यांस मनाचे नोकर समजावें. असो.

 जात अथवा प्रकार, स्थल व परिमाण इत्यादि गोष्टी विचारांत घेतल्यास या संवेदनांचे बरेच वर्ग करितां येतील. उदाहरणार्थ- आंबट व गोड, तांबडा व जांभळा यांनी दर्शविलेल्या संवेदनांना प्रकारदर्शक संवेदने म्हणण्यास हरकत नाही. तसेच अंधक व लखलखीत या शब्दांनी दर्शविलेली संवेदने परिमाणदर्शक होत. नेत्रद्वारे होणारे विकार, कर्णद्वारे होणारी संवेदने स्थलदर्शक समजावी. आणखीहि पुष्कळ बारीक भेद करितां येतील, परंतु प्रस्तुत भागांत फक्त घ्राण व रसना या इंद्रियांविषयींच विचार कर्तव्य आहे, सबब त्यांकडे आपण वळू.