पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७)

पाराचा व कांहीं मानसिक व्यापाराचा अंश आहे. ज्या पदार्थाचा वास आला अशी आपण कल्पना केली आहे, त्याचे काही सूक्ष्म अणु घ्राणेंद्रियांतील ज्ञानतंतूंवर जाऊन आदळतात व त्यांना एक प्रकारची गति देतात; त्यामुळे हे ज्ञानतंतु हेलकावे खाऊं लागतात, व ही गति जात जात मेंदूपर्यंत ज्ञानतंतूंच्या द्वारे जाते. येथवर शारीरिक व्यापार झाला. हा व्यापार संपतांच मनास काहीतरी वास आला' इतकें ज्ञान होते. अशाच त-हेच्या व्यापारास आपण संवेदन हे नाव देऊ. संवेदन हा व्यापार अगदी सूक्ष्म मनोव्यापार होय. रसायनशास्त्रज्ञास ज्याप्रमाणे परमाणू पलीकडे काहीएक सूक्ष्म वस्तूची माहिती नाही (परमाणूंचे पृथक्करण करितां येतच नाही) त्याप्रमाणे मानसशास्त्रज्ञास संवेदन या साध्या मनोव्यापारापेक्षा अधिक साध्या मनोव्यापाराविषयी अद्याप माहितीच नाही. असो.

 संवेदन हा एक अगदी साधा मनोव्यापार आहे. मेंदूकडे जाणारे सूक्ष्म ज्ञानतंतु काहीतरी आघातामुळे कंपायमान झाले की हा व्यापार होतो. संवेदन म्हणजे काय हे आतां आपणांस समजलें. आपण घेतलेल्या उदाहरणांत 'आपणांला काहीतरी वास आला, आपल्या घ्राणेंद्रियावर काहीएक प्रकारचा आघात झाला इतकें ज्ञान मनास झालें की संवेदन हा व्यापार झाला असें आपणांस म्हणता येईल. काहीतरी वास आला एवढें ज्ञान झाल्याने मनाचे समाधान होत नसते. कोणत्या प्रकारचा वास आला, तो कोठून आला, आपणांस अशा प्रकारचा पूर्वी कधी वास आला होता की काय, वगैरे विषयीं मन चौकशी करिते. व या चौकशी अंती वास अमुक एका पदार्थाचाच आला असावा हे ज्ञान मनास होते. यास आपण बोध असें म्हणू. संवेदन व तज्जनित बोध हे दोन भिन्नतऱ्हेचे व्यापार आहेत असे आपणांस (मोठ्या माणसांस) वाटत नाही; कारण हे दोन व्यापार इतके जलद व एका मागून एक त्वरित होतात की, त्यांतील फरक सकृद्दर्शनी आपल्या ध्यानांतच येत नाही; तथापि अगदी लहान-एकदोन महिन्याच्या मुलांच्या मनोव्यापारांचें जर आपण नीट निरीक्षण केलें तर त्यांचे बहुतेक मनोव्यापार संवेदनाच्याच वर्गात घालावे लागतील.