पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

शिकविण्याकडे मुलांचे लक्ष कितपत होते हे समजण्याची मुख्य कसोटी, मलांस आपण जे कांहीं शिकविले असेल त्याचे सार लिहितां अगर सांगतां आले पाहिजे. ही कसोटी कित्येक वेळीं लागू पडणार नाही हे खरे. कारण, अशी कांहीं मंदमती मुले असतात की, त्यांचे खरोखर जरी धड्याकडे लक्ष असले, तरी त्यांतील मथितार्थ त्यांना सांगतां येतच नाही. तथापि अशी मुले फार थोडी असतात. शिक्षकाचे मुख्य कर्तव्य म्हटले म्हणजे, मुलांस कोणत्याहि गोष्टीकडे लक्ष लावण्याची संवय लावून देणे हे होय. सर्व शिक्षणाचा अंतिम हेतु बौद्धिक व नैतिक संवयी मुलांस लावणे हाच होय, ही गोष्ट प्रत्येक शिक्षकाने सदैव लक्षांत वागवावी.

गोषवारा.

 अवधानः— याचा अर्थ मनाची एकाग्रता, अवधान हा एक प्रवर्तक व्यापार होय.
 अवधानाचे प्रकारः-- ऐच्छिक व अनैच्छिक.
 अवधान टिकण्यास अभिरुचि पाहिजे; जिज्ञासा जागृत केल्याने - अभिरुचि उत्पन्न होते.
 मुलांच्या ठिकाणी अनैच्छिक अवधानच आरंभी असते व पुढे हळू हळू ऐच्छिक अवधान येते.
 अवधानास प्रतिबंधक गोष्टी:-- शरिराची अशक्तता, वाईट हवा, मनाचा चंचलपणा वगैरे.
 शिक्षकांनी ध्यानात ठेवावयाच्या गोष्टी:-
 ( १ ) मुलांचे ठायीं ऐच्छिक अवधान नसते.
 ( २ ) अवधानास प्रतिबंधक असणाया गोष्टी नाहीशी कराव्या.
 ( ३ ) कोणताहि धडा लांबलचक असू नये.
 ( ४ ) तसबिरा, चित्रे वगैरे आकर्षक वस्तूचा उपयोग करावा.
 ( ५ ) मुलांची जिज्ञासा जागृत करावी.

 ( ६ ) मुलांस कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या आवडत नाहीत, ते पहावें.