पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४)

विश्रांति घ्यावी. विषय गोड व सुलभ करावा. जेथे जेथें म्हणून शक्य असेल, तेथें तेथें चित्रे, आकृति वगैरेचा उपयोग करावा. मुलांचा मेंदू ज्यावेळी तरतरीत असेल त्यावेळी त्यास गणितासारखे अवघड विषय शिकवावे.कोणताहि विषय शिकविण्यापूर्वी त्या विषयाविषयी मुलांच्या मनांत जिज्ञासा उत्पन्न करावी. प्रत्येक मुलाच्या मनाचे शिक्षकानें नीट निरीक्षण करावें; व त्याच्या मनाची पक्की ओळख करून घ्यावी. याकामी शिक्षकास मुलांच्या आईबापांची बरीच मदत मिळू शकेल.
 मुलांस कोणत्या गोष्टी स्वाभाविक आवडतात, व कोणत्या आवडत नाहीत हे पाहून त्याप्रमाणे शिक्षकाने आपल्या शिक्षणपद्धतीत फेरबदल करावा. एकदम एखादा नवीन विषय शिकवू नये. कोणताहि धडा शिकविण्यास आरंभ करण्यापूर्वी मुलांस काय माहीत आहे, काय नाही, हे अगोदर पहावे व नंतर शिकविण्यास आरंभ करावा. शिक्षक आपल्यावर काहीतरी ओझें लादीत आहे असें मुलांना न वाटेल याबद्दल शिक्षकानें खबरदारी घ्यावी. शिक्षकाने मुलांस प्रेमाने वागवावे व त्यांची सहानुभूति मिळवावी. कित्येकवेळां मुलांचे लक्ष शिक्षकांस शिक्षेच्या साहाय्याने मिळवावें लागते. कोणत्या प्रसंगी कोणत्या साधनाचा उपयोग करावा याविषयी ठाम नियम देता येणार नाही. हे प्रत्येक शिक्षकाने परिस्थित्यनुरूप ठराविले पाहिजे. जी मुलें स्वाभाविकच भित्री असतात त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. आईबापांनी ढिली सोडल्यामुळे जी मुले अडदांड बनलेली असतात त्यांना कडक शासनच केले पाहिजे. जी मुलें थोडीबहुत जाणती असतात अशांना उपदेश करावा. तात्पर्य कोणलाना कोणत्यातरी उपायांनी मुलांचे लक्ष अभ्यासाकडे लाविले पाहिजे. शिक्षक जे शिकवीत असेल त्या कडे मुलांचे लक्ष आहे की नाही हे शिक्षकाने वरचेवर प्रश्न करून पाहावें. कोणताहि धडा शिकविण्याच्या आरंभी, धडा चालू असतां व धडासंपल्यावर प्रश्नांचा उपयोग करावा. असे केले म्हणजे मुलांचें मन तरतरीत राहातें, व साहजिकच मुले लक्ष देतात.आपल्या