पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

एकप्रकारचा सुखजनक अगर दुःखजनक विकार उत्पन्न होतो व ज्यामुळे त्या कल्पनेच्या अगर पदार्थाच्या ठिकाणी आपले मन एकाग्र होते, त्या विकारास अभिरुचि ही संज्ञा देतात. शिक्षकानें मुलांच्या मनांत प्रथम जिज्ञासा उत्पन्न करावी, ह्मणजे तो जें कांहीं शिकवील त्यांत मुलांस गोडी लागून त्याजकडे साहजिकच मुले लक्ष देतील. कोणत्याहि विषयाची गोडी लागावयाची म्हणजे तो विषय अगदी अपरिचित असतां कामा नये. त्या विषयाचे मनांत असलेल्या कल्पनांशी थोडेबहुत तरी साम्य असलेच पाहिजे. उलट पक्षी एखादा विषय फार परिचित असेल तर त्याकडे मन मुळीच लागणार नाही. असो. ऐच्छिक अवधान झणजे काय ते वर सांगितले आहेच. त्यावरून प्रवर्तकशक्तीचे साहाय्याने मन एखाद्या विषयाकडे ओढून बळजबरीने लावितां येते, हे आपल्या ध्यानांत आले असेलच. एवढे मात्र या ठिकाणी सांगितले पाहिजे की, प्रवर्तकशक्तीचे दाबाने जरी मन व पदार्थ अगर कल्पना यांना एकमेकांजवळ नेऊन भिडविले तरी या दोहोंना जोडणारी साखळी ( अभिरुचि ) जर नसेल तर मात्र प्रवर्तकशक्तीचे कांहीं चालावयाचें नाहीं. ज्यास इंग्रजीचा गंधहि नाही अशा माणसाने जर इंग्रजी पुस्तकांतील शब्दांकडे जबरदस्तीने आपले डोळे लाविले तर त्या शब्दांचे ठिकाणी त्याचे अवधान एक क्षणभरहि राहणार नाहीं.
 येथवर अवधान ह्मणजे काय, व त्याचे प्रकार कोणते, यांविषयी सांगितले. आतां अवधानशक्ति केव्हां विशेष प्रबल असते, आणि तिच्या मार्गात कोणते अडथळे येतात वगैरेविषयी विचार करू.
 सकाळीं निजून उठल्यानंतर आपला मेंदू विशेष तरतरीत असतो. यावेळी एखाद्या अवघड विषयाकडे आपले मन लागते. एखाद्या महत्वाकांक्षेमुळेहि आपले मन विषय जरी कंटाळवाणा असला तरी त्याजकडे लागते. शिक्षकाची मर्जी संपादण्याच्या इच्छेने अगर वर्गात वरचा नंबर मिळविण्याच्या इच्छेने अथवा