पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१)

केव्हां व कसा करावा हे सांगण्यापूर्वी अनैच्छिक अवधान कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते याचा विचार केला पाहिजे.
 एखादें मूल फार रडू लागले म्हणजे आपण त्याच्या समोर एखादें भांडे अगर खुळखुळा वाजवितों; एवढ्याने त्याचें रडे बंद न झाल्यास ते भांडे अगर खुळखुळा जोराने वाजवितों अगर फिरवितों, किंवा त्याच्यापुढे काहीतरी नवीन लकलकीत वस्तु आणितो, म्हणजे मूल रडे बंद करिते, असे आपण पुष्कळ वेळां पाहिले असेलच. मूल कितीहि चवताळले असले तरी आपल्या आईचा आवाज ऐकतांच अगर तिने घेतांच शांत होते, हा अनुभव पुष्कळांना असेलच. मूल जेव्हां रडत असते तेव्हा त्याचे सर्व अवधान त्यास होणाऱ्या दुःखांत निमग्न झालेले असते. भांडे वाजविल्याने अगर वर सांगितलेल्या अशासारख्याच अन्य साधनांनी मुलाचे लक्ष त्यास होणाऱ्या दुःखांतून बाहेर आकर्षिले जाते. या वरील गोष्टीवरून आपणांस असा सिद्धांत काढिता येईल की, (१) कांहीतरी विशेष अनुभवाने चित्ताकर्षण होते; (२)तसेच हलणाऱ्या वस्तूमुळे हि (विशेषेकरून लहान मुलांचे ) मन आकर्षिले जाते; (३) त्याचप्रमाणे बाह्य वस्तूंमुळे मनावर होणाऱ्या कार्यात ( मग तें कार्य पदार्थाच्या रंगामुळे असो, अगर रूपामुळे असो अगर दुसऱ्या कशामुळेहि असो ) कमी-जास्तपणा झाल्यास मन आकर्षिले जाते. भाषणापेक्षां गाणे ऐकण्यांत मन पुष्कळवेळां तल्लीन होते, याचे कारण हेच. कोणत्याहि विषयांची गोडी लागू लागली की त्या विषयाकडे आपलें मन साहजिकच लागते. उलट एखादा विषय कंटाळवाणा असल्यास त्याकडे मन लागत नाही हा अनुभव प्रत्येकास आला असेलच. ज्या विषयाची आपणांस गोडी लागते तो विषय आपल्या मनांत एक प्रकारचा तरतरीतपणा आणितो, व मनाचे जडत्व नाहींसें करितो. यावरून अवधान व अभिरुचि अथवा मनोरंजन यांमध्ये अगदी निकट संबंध असावा असे दिसते.
 एखाद्या पदार्थाच्या अगर कल्पनेच्या योगे आपल्या मनांत जो