पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०)

खादा रंगीबेरंगी पदार्थ दाखविला तर एकदम त्याकडे त्याचे लक्ष जातें व नंतर तो पदार्थ जर आपण दूर दृष्टीआड नेऊं लागलों तर तो पाहण्यासाठी व हातांत घेण्यासाठी मूल आपली उत्सुकता दर्शविते. या उदाहरणांत आरंभींचा व्यापार अनैच्छिक अवधान होय. त्यासच पुढे ऐच्छिक अवधानाचे स्वरूप येतें. मूल जसजसे मोठे होत जाते तसतशी त्याच्या अंगची ऐच्छिक अवधानशक्ति वाढत जाते. तिसऱ्या वर्षापासून तो सातवे वर्षाअखेरपावेतों मुलांच्या ठायीं ऐच्छिक अवधानशक्ति अगदी कमी असते, कारण प्रवर्तकशक्तीचाच ( इच्छाशक्तीचाच ) त्यांच्या ठिकाणी जवळ जवळ अभाव असतो. बालोद्यान शिक्षण देतांना ज्या वस्तूंचा उपयोग करावा असे * फ्रोबेलने सांगितले आहे, त्या वस्तू रंगीबेरंगी असतात; अशाच वस्तूंचा उपयोग करण्याचे कारण मुलांच्या अंगीं ऐच्छिक अवधानाचा जवळ जवळ अभाव असतो हे होय. काहीतरी दिखाऊ जिनसांनी मुलांचे मन आकर्षण करून त्याचा विकास करावयाचा, हाच फ्रोबेलचा उद्देश होता. व बालोद्यान पद्धतीतील बीज हेंच होय. असो; वर सांगितले आहेच की, लहान मुलांच्या ठिकाणी ऐच्छिक अवधानशक्ति फारशी नसते.त्यांचे मन आकर्षण करावयाचे असल्यास शिक्षकाने काहीतरी बाह्य साधनांचाच उपयोग केला पाहिजे. या साधनांचा उपयोग


 * फ्रोबेल हा बालोद्यान पद्धतीचा मूळ उत्पादक होय. याचा जन्म जर्मनी देशांत झाला; याने पहिली बालोद्यान शाळा १८३७ साली काढिली. त्याने जो शोधं लाविला त्याचे महत्त्व त्याच्या मरणानंतर ( १८५२ ) युरोपियन राष्ट्रांतील विद्वान् लोकांना कळू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर अखेर पाश्चात्य देशांतील प्राथमिक शाळांत बालोद्यान शिक्षणाचा बराच फैलाव झाला. विशेषेकरून जर्मनी व अमेरिका येथील शाळांत या शिक्षणपद्धतींचा अगदी त्वरित शिरकाव झाला. हिंदुस्तानात अलीकडे नुकतीच ही शिक्षणपद्धति सुरू झाली आहे.