पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९)

होऊन जाते; अशा वेळी एखाद्याने आपणांस हाक जरी मारिली तरी ती आपणांस ऐकूहि येत नाही. अवधान ह्मणजे काय हे स्पष्ट ध्यानांत यावे ह्मणून आपण तो एक ज्ञानदीप आहे असे समजू. दिवा नसला तर अंधारांत असलेल्या वस्तू आपणांस जशा मुळीच दिसणार नाहीत, तद्वत् अवधानरूपी ज्ञानदीप जर नसेल तर आपणांस कांहीं एक ज्ञान होणार नाही. आपले जवळ जर एखादा मिणमिणीत दिवा असेल तर अंधारांत असलेल्या जिनसा आपणांस अस्पष्टच दिसतील. त्याचप्रमाणे आपलें जर एखाद्या वस्तूकडे अर्धवट लक्ष असेल, तर आपणांस होणारे ज्ञानहि तशाच प्रकारचे होईल.
 एखाद्या वस्तूकडे आपण जेव्हां बळजबरीने आपले लक्ष लावितों, तेव्हा आपल्या मनाची जणू काय सर्व किरणें एकत्र करून त्यांचा प्रकाश त्या वस्तूवर पाडितो. अर्थात् यामुळे आपणांस ती वस्तु स्पष्ट दिसते, म्हणजे आपणांस त्या वस्तूचे पूर्ण ज्ञान होते.
 मानसशास्त्रज्ञांनी अवधानाचे दोन प्रकार केले आहेत, ते येणेप्रमाणे:-- (१) ऐच्छिक अवधान आणि (२)अनैच्छिक अवधान. आतां ऐच्छिक अवधान ह्मणजे काय ते आपण पाहूं. एखादा विषय कंटाळवाणा जरी असला तरी तो परीक्षेस नेमला असल्यामुळे आपण त्या विषयाकडे आपले मन बळजबरीने लावितों, हे ऐच्छिक अवधानाचे उदाहरण होय. या ठिकाणी आपले मनावर प्रवर्तक शक्तीचा दाव पडतो, सबब अशा प्रकारच्या अवधानास ऐच्छिक अवधान ह्मणतात. आतां अनैच्छिक अवधान म्हणजे काय याचा आपण विचार करूं. आपण एखादे पुस्तक वाचीत आहो असे समजूं. अशा वेळी एकदम काहीतरी आवाज ऐकू आला तर साहजिकच आपले लक्ष त्याजकडे जाते. हे अनैच्छिक अवधानाचे उदाहरण झालें. अगदी लहान मुलांच्या ठिकाणी पहिल्या प्रकारच्या अवधानाचा अभाव असतो असे म्हटल्यास चालेल. त्यांस जो पदार्थ दिसेल अगर जो आवाज ऐकू येईल त्याकडे त्यांचे लक्ष जाते. त्यांची अवधानशक्ति इतकी अस्थिर असते की, एक क्षणभरसुद्धा ती एके ठिकाणी रहात नाही. लहान मुलास ए-