पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

 (१) जन्मापासून तिसऱ्या वर्षाअखेरः- या कालांत ज्ञानेंद्रिये विशेष तीक्ष्ण.
 (२) चवथ्या वर्षापासून सातव्या वर्षाअखेर:- कल्पनाशक्ति व भावना विशेष प्रबल; जिज्ञासाहि विशेष जोरदार.
 (३) आठव्या वर्षांपासून चवदाव्यावर्षाअखेरः- स्मरणशक्ति विशेष प्रबल; उच्च बौद्धिक व्यापारांस व प्रवर्तकशक्तीच्या व्यापारांस आरंभ.
 (४) एकवीस वर्षाअखेर:- मानसिक विकास पूर्ण.
बौद्धिक विकासक्रमः- संवेदन, बोध, स्मरण, कल्पना व विचार.

भाग चौथा.
—-::--
अवधान.

 मनोव्यापार निरनिराळ्या प्रकारचे आहेत असें मागे सांगितले आहे. काही मनोव्यापार बौद्धिक तर काही प्रवर्तक असतात, तसेच कांहीं सुखदुःखादि भावनांसारखे अगदी साधे असतात हेहि वर सांगितले आहेच. अवधान ह्मणून जो मनोव्यापार आहे तो प्रवर्तक वर्गातील होय. आपण ज्यास अवधान म्हणतो ती एक प्रकारची मनाची स्थिति होय. ही स्थिति अशा प्रकारची असते की, या स्थितीत मनासमोर येणाऱ्या वस्तूनें अगर कल्पनेने मन सर्वस्वी आकर्षिले जाते. किंवा अवधान म्हणजे मनाची एकाग्रता (अर्थात् मनासमोर जो विषय असेल त्याच्या ठिकाणी) ही अवधानाची अगदी सोपी व्याख्या झाली.
 अमुक एका वस्तूकडे आपले मन जातें असें आपण नेहमी म्हणतो, याचा अर्थ इतकाच की, त्या वस्तूच्या ठायी असलेल्या काही विशेष गुणामुळे त्या वस्तूकडे आपले मन आकर्षिले जाते. एखादें पुस्तक वाचण्यांत आपण अगदी गुंग होऊन जातो या वेळी आपले सर्व मन त्या पुस्तकांतील मजकुरांत अगदी निमग्न