पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)

काय उपयोग, याविषयी मुलांचे मनांत जिज्ञासा उत्पन्न होते. व मुले अशा तऱ्हेचे प्रश्नहि वडील माणसांस विचारतात, हे प्रत्येकास माहीत असेलच. या कालांत कल्पनाशक्ति विशेष प्रबल असते. व स्मरणशक्तीहि हळू हळू वाढू लागते. मुलांना खेळण्याची फार हौस असते; कारण, त्यांची इंद्रिये व स्नायू यांना एक प्रकारची विशेष चपलाई असते. राग, लोभ, भीति वगैरे भावना बऱ्याच दृष्टोत्पत्तीस येतात. प्रवर्तकशक्तीहि थोडथोडी दिसू लागते. या कालास आपण बालोद्यानशिक्षणाचा काल हे नांव देऊं.
 (३)आठव्या वर्षापासून चवदाव्या वर्षाअखेरचा कालः- या कालांत स्मरणशक्ति विशेष तीव्र असते. बारावेवर्षी तर स्मरणशक्ति फार प्रबल असते. अमरकोशांतील श्लोक या वयांत मुले किती त्वरित पाठ करितात हे आपणांस माहीत असेलच. उच्च बौद्धिक व्यापार-निर्णय, विचार, अनुमान वगैरेहि हळू हळू प्रकट होऊ लागतात, इतकेच नव्हे तर त्यांवर प्रवर्तकशक्तीचा अंमल चालू शकतो. राग, भीति वगैरे हलक्या दर्जाच्या भावना कमी कमी होत जातात; व हळू हळू दुसऱ्या विषयी आदर, प्रीति, भूतदया, स्वाभिमान, खऱ्याविषयी प्रीति वगैरे उच्च भावना दृष्टोत्पत्तीस येतात. या कालास आपण प्राथमिक शिक्षणाचा काल हे नांव देऊ.
 (४) एकवीस वर्ष अखेरचा कालः-- या कालांत सर्व मानसिक व्यापारांचा पूर्ण उदय होतो. मुलांस सर्वकाही समजू लागते. मुलें पूर्णपणे स्वावलंबी व स्वतंत्र होतात. आपले कर्तव्य काय, आपला इतर जगाशी व परमेश्वराशी काय संबंध आहे वगैरे सर्वकाही या कालांत समजू लागते.
 मनोव्यापारात जेव्हां या तऱ्हेच्या घडामोडी होत असतात तेव्हां शरिरांतहि अशाच तऱ्हेच्या काही घडामोडी होत असतातच. वर लिहिलेले काल ठरवितांना मानसशास्त्रज्ञांनी हीहि गोष्ट विचारांत घेतलेली आहे.
 पहिल्या कालांत म्हणजे तीन वर्षांच्या आंतील कालांत मुलांस सर्व दांत येतात. या कालांत प्रथम मुलें पूर्णपणे परावलंबी