पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५)

तकांत रुसो नांवाचा एक विख्यात तत्त्ववेत्ता होऊन गेला. यानेच युरोपांतील शिक्षणपद्धतीस निराळी दिशा दाखविली. व याचेच ( Emile ) 'एमिल्' या लेखाने यूरोपखंडभर सतराव्या व अठराव्या शतकांत चालू असलेली घोकंपट्टीची पद्धत बदलली व यानेच खरें शिक्षण द्यावयाचे असल्यास, आईबापांनी व शिक्षकांनी मुलांचे नीट निरीक्षण केले पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट जगाच्या नजरेस आणिली. उत्तम तऱ्हेचे शिक्षण कसे द्यावें याविषयी लिहितांना याने असे म्हटले आहे की, मूल बारा वर्षांचे होईपर्यंत त्यास समाजापासून अलग ठेवावें, ह्मणजे त्यास काहीएक वाईट संवयी लागणार नाहीत. हे मत खरे खोटे ठरविण्याचे आपणांस मुळीच प्रयोजन नाही. त्याने जे काही लिहिलेले आहे त्यावरून परिस्थितीचा मनोविकासावर बराच बरा वाईट परिणाम होत असला पाहिजे एवढे मात्र निर्विवाद सिद्ध होतें.
 मनोविकास कसकसा होत जातो हे दाखविण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी त्याचे तीन चार काल केले आहेत. मुलांच्या मनाचे स्थितीत वयपरत्वें कांहीतरी फेरबदल होत जातात त्यांवरून हे काल ठरविले आहेतः-
 (१) जन्मापासून तिसरे वर्ष संपेपर्यंतचा कालः- याकालांत मूल सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असते. मुलाची इंद्रियें ( ज्ञानेंद्रियें ) फार तीक्ष्ण असतात. कोणतीहि रंगीबेरंगी अपरिचित वस्तु पाहिली की, ती घेण्याबद्दल मूल धडपडू लागते. आपण इतरांहून भिन्न आहों हे मुलास हळू हळू समजत जाते. भीति, राग,प्रीति वगैरे भावना थोड्या बहुत प्रमाणाने असतात. प्रवर्तकशक्तीचा मात्र जवळ जवळ अभाव असतो; या कालास आपण स्तनपानकाल हे नांव देऊ.
 (२)चवथ्या वर्षापासून सातव्या वर्षाअखेरपर्यंतचा कालः- मुलांस चांगले चालतां व साधारण बोलता येऊ लागते. यामुळे ज्ञानेंद्रियांस बरीच मदत होते. कोणतीहि नवी वस्तु पाहिली की, ती काय आहे, कशी आहे, अशी कां आहे, तशी कां आहे, तिचा