पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)

पुष्कळ मुलांच्या शरिराची ठेवण आईबापांच्या अगर कोणातरी अगदी जवळच्या नातलगाच्या (मामा, काका वगैरे यांच्या) वळणावर असते हे आपण नेहमी पाहतो. नाक, डोळे, कान, हात, पाय हे जसे शरिराचे निरनिराळे अवयव आहेत व यांकडे ज्याप्रमाणे निरनिराळी कामें दिलेली आहेत त्याचप्रमाणे मनाचेहि निरनिराळे भाग अगर अवयव आहेत व त्या अवयवांकडेहि निरनिराळी कामें दिलेली आहेत. मन हे अंतःशरीर आहे असे म्हणण्यास हरकत नाही. मुलांचे बाह्यशरीर ज्याप्रमाणे आईबापांच्या वळणावर असते त्याचप्रमाणे मन अगर अंतःशरीरहि आईवापांच्या वळणावर असते, असें पुष्कळ वेळां आढळते. 'गवयाचे पोर जरी रडले तरी सुरांत रडते' असे म्हणतांना आपण पुष्कळवेळां ऐकले असेलच. याचा अर्थ इतकाच की, काही मानसिक प्रवृत्ती आईबापांतून मुलांत बऱ्याच अंशी उतरतात. कांहीं कांहीं रोगांची ( मूळव्याध, दमा वगैरे यांची ) मुळेहि संततीत उतरतात. चिकित्सा करितांना कुटुंबाचा पूर्वेतिहास ज्याप्रमाणे वैद्य लोकांना पुष्कळ उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे पूर्वेतिहास शिक्षकांचेहि उपयोगी पडतो. मुलांची स्वाभाविक प्रवृत्ति कोणीकडे आहे हे समजले ह्मणजे अर्थातच त्यांस योग्य वळण कसे द्यावें हें शिक्षकांस ठरविणे सुलभ जाते. असो. वर सांगितलेल्या दोन गोष्टींपैकी दुसरीवर ह्मणजे परिस्थितीवर मानसिक विकास अगर शिक्षण विशेष अवलबून असते. एखादें मूल जन्मतांच जर त्यास मनुष्यवस्तीपासून दूर अशा एकांतस्थळी नेऊन ठेविलें ( मग त्याची नैसर्गिक बुद्धिमत्ता कितीहि असो ) तर त्याचे मनाचा विकास फारसा होणार नाही, इतकेच नव्हे तर, पशूमध्ये व त्यांच्यांत विशेष फरक दिसणार नाही. इंग्लंडांत लॉक ह्मणून एक मोठा तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्याचे मत असे होते की, सर्व मुलांची नैसर्गिक बुद्धिमत्ता सारखीच असते, व शिक्षणाने मुलांस वाटेल त्या प्रकारचे वळण आपणांस लावितां येते. कँट म्हणून जो मोठा प्रसिद्ध तत्त्ववेत्ता होऊन गेला त्याचेंहि मत असेच होते. एकोणीसावे श-