पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)

पदार्थाचे वजन,आकार कायम राहून त्याच्या स्थितीत पालट झाला ह्मणजे त्यास विकास ह्मणावें. वाढ व विकास एकाकाळींच चालू असू शकतील. अमुकएक काळपावेतों वाढच चालू असते व नंतर विकासास आरंभ होतो अशांतला प्रकार नाही.
 आतां आपण मनाचे वाढीकडे व विकासाकडे वळू. मनाची वाढ ह्मणजे मानसिक सामुग्रीत भरती; व विकास ह्मणजे या सामुग्रीची निरनिराळी रूपांतरे होणे. संवेदने व तज्जनित बोध यायोगें मनाची वाढ होत असते-ह्मणजे मानसिक सामुग्रीची मनांत भरती होत असते. नेत्र, रसना, त्वचा, घ्राणेंद्रिय, व कर्ण यांच्या द्वारे आपणांस बाह्य वस्तूंचे ज्ञान होते, व या ज्ञानाचा ठसा आपल्या मनावर राहतो व त्याची आपणांस पाहिजे तेव्हां स्मृति होते. स्मृतीपासूनच कल्पनाशक्ति, विचारशक्ति, व निर्णयशक्ति यांची उत्पत्ति होते; व याच शक्ती मनाचा विकास करितात. या शक्ती मनांत बाहेरून कोणताहि नवा पदार्थ आणीत नाहीत, तर ज्या काही कल्पना मनांत सांचलेल्या असतात त्यांचाच एकमेकांशी काहीतरी संबंध जुळवून आणून त्यांना निरनिराळी रूपें देतात. तात्पर्य, ज्ञानेंद्रियेच मनाचे विकासास लागणारी सामुग्री पुरविण्याचे काम करितात. पुरे इतकी व चांगले प्रकारची सामुग्री जर नसेल तर मनाचा विकास बरोबर रीतीने होणे शक्यच नाही. ज्ञानेंद्रियांनी आपले काम जर योग्य रीतीने केले तरच उपयोग. व ह्मणूनच इंद्रियशिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया समजला जात आहे. बालोद्यान, वस्तुपाठ वगैरे विषयांना जें अलीकडे विशेष महत्त्व दिले जात आहे त्याचे कारण तरी हेच; असो. इंद्रियशिक्षण ह्मणजे इंद्रियांना योग्य वळण देणे. ज्या इंद्रियाकडे में काम परमेश्वराने सोपविलें आहे ते त्याकडून व्यवस्थेशीर व वेळचेवेळी करून घेणे हेच शिक्षकाचे मुख्य कर्तव्य होय.

 मानसिक विकास मुख्यतः दोन गोष्टींनी ठरविला जातो. (१.) मनाची स्वाभाविक प्रवृत्ति (२) व परिस्थिति; परिस्थितीत आपल्या समोर असलेली माणसें व वस्तू यांचा समावेश होतो.