पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

 (३) प्रवर्तक-अवधान, निश्चय वगैरे.
शिक्षकांनी ध्यानात ठेवावयाच्या गोष्टी:-
 (१) शिक्षण म्हणजे मनाचा व शरिराचा योग्य विकास.
 (२) मनाच्या व्यापारांची माहिती नसल्यास शिक्षणाचे काम बरोबर होणार नाही.
 (३) कोणताहि विषय शिकवितांना अभिरुचि उत्पन्न करावी व जिज्ञासा बाढवावी.
 (४) अवधानाचीहि मदत पाहिजेच.

भाग तिसरा .
मनाची वाढ व विकास.

 वाढ म्हणजे काय, व विकास म्हणजे काय हे प्रथम समजले पाहिजे, म्हणजे मग मनाची वाढ व विकास म्हणजे काय ते सहज समजेल. पक्षी अंडी घालतात हे सर्वांस माहीत आहेच. ही अंडी प्रथम अगदी लहान असतात. परंतु हळू हळू ती मोठी होत जातात. (त्यांच्या मोठेपणाची कांहीं-एक मर्यादा ठरलेली असतेच.) काही काळाने या अंड्यांची वाढ बंद होते. ही वाढ बंद होतांच अंडी फुटून त्यांतून पिलें बाहेर येत नाहीत. अंड्यांची वाढ पुरी झाल्यावरहि काही दिवस लोटावे लागतात, म्हणजे त्यांत पिलें पूर्ण तयार होऊन ती बाहेर पडतात. एखादें लहान अंडे जर आपण मुद्दाम फोडून पाहिले तर त्यांत एक चिकट द्रवरूप पदार्थ भरलेला आहे असें दिसेल. या पदार्थाचे परिमाण काही काळ पावेतों वाढते, नंतर ही वाढ बंद होऊन या पदार्थाच्या स्थितीत काही फेरफार होतात डोळे वगैरे निरनिराळे अवयव होऊन या पदार्थात चलनवलन शक्ति येते-म्हणजे पिलू तयार होते. यावरून आपल्या असें ध्यानात येईल की, वाढ म्हणजे पदार्थाच्या परिमाणांत फेरफार, व विकास म्हणजे पदार्थाच्या स्थितीत फेरफार,