पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११)

शिक्षकांस अजीबात पालटतां येतच नाही. याकरितां मनाचें मूळचें स्वरूप कसे आहे, काय आहे, हे शिक्षकांस माहीत पाहिजे. एखाद्या वक्त्यास ज्याप्रमाणे आपल्या श्रोतृसमुदायाची चांगली माहिती असली म्हणजे आपले भाषण व त्यांतील मुद्दे त्यास नीट समजतील अशा रीतीने पुढे मांडिता येतील, अगर एखाद्या वैद्यास ज्याप्रमाणे रोग कोणता आहे, काय आहे, कशामुळे झाला, रोग्याची प्रकृति थंड आहे का पित्तकर आहे हे समजलें म्हणजे जसें योग्य औषध देता येईल, तशीच स्थिति शिक्षकांची असते. शिक्षकांस मुलांच्या मनाचे खरे स्वरूप समजले पाहिजे; व हे चांगल्या रीतीने समजण्यास मनाचे निरनिराळे व्यापार कोणते हे समजले पाहिजे. एवढ्यानहि त्यांचे काम भागणार नाही. मनाचे नुसते घटकावयव समजून भागणार नाही.तर या घटकावयवांमध्ये अगदी निकट संबंध आहे हेहि शिक्षकांच्या मनांत पक्के बिंबले पाहिजे. शाळेतील शिक्षकाने ही गोष्ट सदैव ध्यानांत बाळगिली पाहिजे की, आपले मुख्य कर्तव्य बौद्धिक शिक्षण देणे हे जरी आहे, तरी हे शिक्षण यथायोग्य होण्यास प्रवर्तकशक्तीचीहि मदत पाहिजे. ती जर नसेल तर आपले काम नीट होणार नाही. तसेंच, कोणताहि विषय शिकवीत असतांना मुलांची जिज्ञासा जागृत केली पाहिजे, व या जिज्ञासेच्या मदतीने विषयाभिरुचि उत्पन्न केली पाहिजे. जे शिक्षण मुलांस कंटाळवाणे वाटेल तें मानसशास्त्रदृष्टया अगदी चुकीचें समजावें. असो; शिक्षण म्हणजे मनाचा व शरिराचा सर्व बाजूंनी सारखा व समतोल विकास असें वर एक दोन वेळां सांगितले आहे. आता आपण विकास म्हणजे काय, मनोविकास कसकसा होत जातो वगैरे गोष्टींचा विचार करूं.

गोषवारा.

 मनोव्यापाराचे प्रकार:----(१) बौद्धिक- स्मरण, कल्पना, अनुमान,निर्णय वगैरे.

 (२) भावना विषयक- राग, लोभ, तहान, भूक वगैरे.