पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)

 मन म्हणून जे काही आहे ते एकच आहे; पण तें त्रिमूर्त आहे. म्हणजे तीन निरनिराळे परंतु एकमेकांशी अगदी दृढतर संबंध ज्यांचा आहे असे व्यापार करणारी मन ही एक शक्ति आहे. याच्या स्पष्टीकरणार्थ आपण एक उदाहरण घेऊं:-
 समजा की आपला एक मित्र एखादी मोठी परीक्षा पास झाला(१) असे आपल्याला समजले (२) हे समजतांच आपणांस आनंद झाला ( ३ ) लगेच आपण त्याला अभिनंदनपर तार पाठविण्यासाठी तार ऑफिसांत गेलो. यांत पहिला व्यापार बौद्धिक, दुसरा सुखजनक व तिसरा कृत्युत्पादक होय.
 मनाचा कोणताहि व्यापार सुरळीतपणे होण्यास काही विवक्षित गोष्टींची अवश्यकता असते. त्यांपैकी मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे मेंदूची निरोगी स्थिति ही होय. हिचे महत्त्व किती आहे हे मागील भागांत सांगितले आहेच. याच्या इतकीच जवळ जवळ महत्त्वाची दुसरी बाब अवधान होय. कोणताहि मनोव्यापार घ्या, मग तो बौद्धिक असो, प्रवर्तक असो अगर सुखदुःखासारखा अगदी साधा व्यापार असो, तो अवधानाच्या मदतीवांचून चालणारच नाही. मेंदूची निरोगी स्थिति व अवधान या दोन गोष्टी प्रत्येक मनोव्यापारास अवश्य पाहिजेत. आता आपण वर दिलेल्या मनोव्यापाराचे माहितीचा शिक्षकांस कसा उपयोग करितां येईल ते पाहूं.
 मनाच्या स्वरूपाचे वर्णन वर दिलेच आहे; आतां शिक्षकांस यापासून काय शिकावयाचें तें सांगितले पाहिजे. मुलांचे मन म्हणजे एखादें भांडें अगर पीप, यांत शिक्षकांस वाटेल ते खेचून भरतां येते, ही पूर्वीची शिक्षणाच्या स्वरूपाची कल्पना अलीकडे अगदी चुकीची ठरलो आहे; व शिक्षण म्हणजे मुलांच्या मनाचा व शरिराचा सर्व बाजूंनी सारखा व समतोल विकास होय, ही कल्पना सर्वमान्य झाली आहे. शिक्षकांस मुलांच्या मनावर काहीएक प्रकारचे विवक्षित कार्य करावे लागते; हे कार्य कोणते म्हणाल तर मुलांच्या मनास योग्य वळण लावणे हे होय. मनाचें मूळस्वरूप