पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

 मन व शरीर— यांमध्ये अगदी निकट संबंध आहे. हा संबंध मेंदू व मज्जारज्जु यांच्याशीच आहे.
 मेंदूचे भाग-- मोठा मेंदू व लहान मेंदू. मोठया मेंदूचा संबंध विचार, कृति वगैरेशी; लहान मेंदूचा संबंध चलनवलन क्रियांशी.
 मज्जारज्जु -- पाठीच्या कण्यांत असतो व यास पुष्कळ शाखा, उपशाखा असतात. ज्ञानतंतू यापासून निघालेल्या सूक्ष्म शाखा होत.
 शरीर निरोगी तर मन निरोगी; यावरून चांगले अन्न, शुद्धहवापाणी, व्यायाम वगैरेचे महत्त्व समजेल.

भाग दुसरा.
मनोव्यापार.

 मागील भागांत मन म्हणजे काय याविषयी सांगितलेच आहे.आतां मनाच्या मुख्य व्यापारांविषयी या भागांत थोडीशी माहिती देतो. पूर्वी सांगितले आहेच की, मन म्हणून एक परमेश्वराने मनुष्यमात्राच्या ठिकाणी काही अद्भुतशक्ति घालून ठेविली आहे. या शक्तीचे व्यापार इतके सूक्ष्म व संकीर्ण असतात की, ते वेगळे वेगळे आहेत असे समजणे चुकीचे होईल. तथापि मनाचे पृथक्करण करून त्याचे घटकावयव वेगळे करितां येतात असे आपण क्षणभर समजू.
 मनोव्यापाराचे मुख्य तीन वर्ग करितां येतील ते येणेप्रमाणे:--
 (१) सुखदुःखादि व्यापारः-यांत तहान, भूक, राग, प्रीति वगैरेचा समावेश होतो.
 (२) बौद्धिक व्यापारः-यांत स्मरणशक्ति, कल्पनाशक्ति, अनुमान वगैरेचा समावेश होतो.

 ( ३ ) प्रवर्तकव्यापारः-यांत अवधान, दृढनिश्चय वगैरे येतात.