पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

बाजूस असलेला मेंदूसारखा भाग यांची कामें नीट ध्यानांत यावी म्हणून आपण या सर्वांना एकाच कुटुंबांतील माणसें असें समजूं.
 मोठा मेंदू हा बाप, मज्जारज्जु आई व मज्जारज्जूचे डाव्या व उजव्या अंगाकडील मेंदूसारखा भाग मुलगी आहे अशी आपण घटकाभर कल्पना करूं. फार महत्त्वाची कामें बाप करितो, कांहीं घरगुती कामें आई करिते व अगदी क्षुल्लक कामें मुलगी करिते.
 वर दिलेल्या वर्णनावरून मनाचा व शरिराचा ( मेंदू) किती निकट संबंध आहे हे दिसून येईल. सर्व मानसिक व्यापार नीट सुयंत्रित चालावे अशी जर आपली इच्छा असेल तर ज्यायोगें आपला मेंदू निरोगी व तरतरीत राहील तेच उपाय आपणांस केले पाहिजेत. आपले शरीर निरोगी ठेविले पाहिजे. चांगले अन्न, शुद्ध हवापाणी, विश्रांति, व्यायाम या गोष्टींकडे आपणांस विशेष लक्ष दिले पाहिजे. अलीकडे सरकारी शाळांतून शारीरिक शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे, याचे कारण हेच. मानसिक शिक्षण हे जरी शाळेतील शिक्षकांचे मुख्य काम आहे,तरी शिक्षकांनी ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की, मुलें जर निरोगी नसतील तर त्यांच्या मानसिक शक्तींचा योग्य तऱ्हेनें विकास करितां येणारच नाही. शिक्षकानें मुलास शारीरिक खेळ खेळण्याची हौस लावावी. ही हौस स्वतांच्या उदाहरणाने व उपदेशाने लावितां येण्यासारखी आहे. शाळेंत सुद्धां एखादा धडा शिकवून झाला की पांच मिनिटे उठबशांसारखी कवाईत मुलांकडून करवावी. तात्पर्य, शिक्षकानें नुसत्या मानसिक शिक्षणाकडेसच लक्ष देऊ नये.

गोषवारा.

 मन-ज्ञान, सुखदुःखादि भावना व प्रवृत्ति हे व्यापार ज्यामुळे होतात तें.

 शिक्षण व मानसशास्त्र-- वैद्य लोकांस शरीरशास्त्राची माहिती असणे ज्याप्रमाणे जरूर आहे. त्याप्रमाणे शिक्षकांसहि मानसशास्त्राची माहिती असणे जरूर आहे.