पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५५)

कोणते व वाईट कोणते हे समजणे शक्यच नसते; तेव्हां बौद्धिक शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावें.
 (४) चांगल्या भावनांचा विकास करावा. हा विकास करण्याचे प्रसंग शाळेत पुष्कळ वेळां येतात. मुलांस एकमेकांस मदत करावयास शिकवावें. काही काही शाळांतून गरीब मुलांकरितां फंड जमविण्याची चाल आहे. हा फंड मुले आपखुशीने देतात व तो देण्याकरितां कित्येक मुलांना स्वतांच्या खर्चात काटकसर करावी लागते व ती ते आनंदानें करितात असे अनुभवास आले आहे.
 (५) प्रवर्तकशक्तीचा विकासहि फार महत्वाचा आहे. नीतिविषयक प्रवृत्ति म्हणजेच सद्गुण. काहीएक काळ पावेतों मुलांस धाकानें कोणतीहि कृति करावयास लावावी लागते हे खरे; तरी पण योग्य वेळ येतांच मुलांस सन्मार्ग कोणता ते दाखवून द्यावे. अगोदर भावना, नंतर विचार, नंतर निर्णय व शेवटी कृति असा नेहमी क्रम असतो. भावना, विचार व निर्णय यांनाच फक्त जागृत करून उपयोग नाही, तर कृति अवश्य या मागोमाग झाली पाहिजे ही गोष्ट शिक्षकांनी नेहमी ध्यानात बाळगावी.

गोषवारा.

 मुलांच्या विचारपूर्वक कृति सुरू झाल्या म्हणजे प्रवर्तक शक्तींचा बराच विकास झाला असे समजावें. प्रवर्तकशक्तींच्या उच्च विकासास बुद्धीचा विकास व भावनांचा विकास यांची बरीच मदत होते.
 विचारपूर्वक कृति करणे म्हणजे भावनांवर दाब ठेवणे होय.
 मनावर दाब ठेवणे:---यांत तीन गोष्टी येतात. (१) प्रवर्तक प्रेरणांचें संयमन, (२) भावनांचे संयमन (३) विचारांचे संयमन.
 अवधानावर दाब ठविल्याने सर्व मनावर दाब रहातो.
 स्वभाव व शील:- स्वभाव म्हणजे काहीएक ठराविक वर्तन करण्याची प्रवृत्ति. सुस्वभावास शील असें म्हणतात. कसलेली व न बदलणारी प्रवर्तकशक्ति व तदंतर्गत भावना व विचार