पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५४)

निश्चयी असतात. (३) काही थंड व जड ( कफप्रकृति) असतात. कांही रसिक असतात; त्यांना कविता, गायन सृष्टिसौंदर्य यांची आवड असते. कारण त्यांची कल्पनाशक्ति फार प्रबल असते. परंतु अशा शुद्ध प्रकृतींची मुले फारच थोडी असतात. बहुधा पुष्कळ मुलांच्या प्रकृति मिश्र असतात. मुलांस शिस्त लावतांना त्यांच्या नैसर्गिक प्रवृतींचा अवश्य विचार केला पाहिजे. वैद्यांस ज्याप्रमाणे रोग्याच्या प्रकृतीच्या मानाने ( उष्ण, पित्त, थंड प्रकृति वगैरे ) औषधाची योजना केली पाहिजे; त्याप्रमाणे शिक्षकांसहि मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींच्या मानाने योग्य हेतूंचा उपयोग केला पाहिजे. उदाहरणार्थ:- जी मुलें तापट व निश्चयी असतात, त्यांशी वादविवाद करीत बसू नये; कारण त्यापासून फारसा फायदा होत नसतो. तसेच थंड व जड मुलांना काहीतरी कृति करावयास लावावयाची असेल तर उतावीळपणा उपयोगी पडत नसतो.
 मुलांचे शील बनविणे यांत मुलांस चांगल्या संवयी लावणे, त्यांना स्वकर्तव्याची ओळख करून देणे व तें करावयास लावणे, चांगल्याकडे नेहमी त्यांच्या मनाची प्रवृत्ति व्हावी असे करणे वगैरे सर्व गोष्टींचा समावेश होतो, इत्यादि गोष्टी पूर्वी सांगितल्या आहेत. आतां मुलांस नैतिक शिक्षण कसे द्यावे म्हणजे सद्गुण कसे लावावे याविषयी काही सामान्य माहिती देतो.
 (१) कोणताहि सद्गुण अंगी येण्यास प्रत्यक्ष कृति केली पाहिजे. तेव्हां अशा प्रकारची कृति मुलांस करावयास लावावी म्हणजे हळू हळू त्यांना सद्गुणाची खरी किंमत समजू लागते, व मग आपोआप सद्गुणांवर त्यांचे प्रेम बसू लागते. खरेपणामुळे दुसऱ्याचा आपणांवर विश्वास बसतो, उद्योगामुळे यशप्राप्ति होते, प्रीतिपासून प्रीति वाढते, दुसऱ्यावर उपकार केल्यापासून त्याच्या मनांत आपल्याविषयी कृतज्ञता उत्पन्न होते वगैरे गोष्टी मुलांच्या प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागल्या म्हणजे आपोआप त्या त्यांना समजू लागतात.
 (२) शाळेतील शिस्त मुलांस नैतिक शिक्षण देण्याचे कामी फार उपयोगी पडते. याविषयी पुढे सविस्तर विवेचन केले आहे.
 (३) बुद्धीचा विकास काही मर्यादेपर्यंत झाल्याशिवाय चांगले