पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५३)

लागू पडत नसतात. खाऊ देऊन, अगर यासारख्याच दुसऱ्या कोणत्या तरी साधनाने आपणांस लहान मुलांकडून एखादे काम करून घेता येते. परंतु या साधनांचा मोठ्या मुलांच्या ठिकाणी उपयोग होत नसतो.
 मुलें प्राथमिक शाळांत सहाव्या वर्षापासून येऊ लागतात व फार झाले तर सोळाव्यावर्षापर्यंत रहातात. सहाव्या वर्षापासून बाराव्या वर्षापर्यंतचा काल बाल्यावस्थेचाच होय. या कालांत मुलांची बुद्धि अगदी कोती असते. चांगले काय, वाईट काय, खरें कोणते व खोटें कोणते, हे त्यांना समजत नसते. या कालांत मुलांस वाईट मार्गाकडे न जाऊ देणे हेच शिक्षकाचे मुख्य कर्तव्य होय. भीति, कृतिप्रेम, जिज्ञासा, बक्षिसें, शिक्षा, शाबासकी वगैरे हेतूंनी मुलांस वळण लावण्याचा यत्न करावा. मुलांस प्रेमाने वागवावें, त्यांच्या अडचणी नाहीशा कराव्या व या रीतीने त्यांची सहानुभूति मिळवावी.
 मुले सरासरी बारा वषाची झाली म्हणजे त्यांच्या विचारशक्तीचा विकास अधिकाधिक होऊ लागतो. हळू हळू त्यांना स्वकर्तव्य कोणते तें समजू लागते. त्यांची सदसद्विवेक बुद्धिहि जागृत होत जाते. मुलांच्या अंगांत एक प्रकारचा जोम येतो व स्वाभिमान उत्पन्न होतो. तेव्हा या कालांत ( म्हणजे बाराव्या वर्षापुढील कालांत ) कृतिप्रेम, दुसऱ्यावर वरचढ करण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा या सारख्या हेतूंचा चांगला उपयोग होतो. धाक, शिक्षा यांचा फारसा उपयोग होत नाही. तात्पर्य, कोणत्या हेतूंचा उपयोग केव्हां करावयाचा हे वयपरत्वे ठरविले पाहिजे.
 मुलांची नैसर्गिक प्रवृत्ति व तिचे महत्त्वः- मुलांच्या बाह्य स्वरूपांत ज्याप्रमाणे फरक असतो त्याप्रमाणे त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीतहि फरक असतो; व हा फरक शिक्षण दृष्टया फार महत्त्वाचा असतो:-(१) काही मुलें उल्हासी पण शीघ्रकोपी असतात; व त्यांच्या भावना विशेष प्रबल असतात. मात्र त्यांचा राग फार वेळ टिकत नाही. (२) काही मुले ( पित्तप्रकृति ) तापट असतात पण