पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५२)

 चौथी गोष्ट- स्वतांचे उदाहरण. याविषयी पूर्वी पुष्कळवेळां सांगितले आहेच.
 पांचवी गोष्ट- मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींचीहि पूर्ण ओळख शिक्षकाने करून घेतली पाहिजे; असे केले तरच मुलांस वळण कसें लावावें हें शिक्षकास समजेल. मुले जेव्हां खेळ खेळत असतात तेव्हां त्यांचे खरे स्वरूप समजतें; या वेळी शिक्षकाने मुलांशी मिसळावे.
 शिक्षकाने एक गोष्ट नेहमी ध्यानात बाळगावी ती ही की, शील बनविणे म्हणजे सर्व मानसिक शक्तींचा विकास करणे होय; नुसत्या प्रवर्तकशक्तीचाच विकास करावयाचा नाही.
 हेतु व त्यांचे महत्वः- मुलें ज्या हेतूंमुळे कृति करण्यास प्रवृत्त होतात त्यांची शिक्षकाने माहिती करून घ्यावी असे वर सांगितले आहे. हेतूस इतके महत्त्व का याविषयी थोडासा विचार करूं.
 (१) हेतूंमुळेच आपण एखादी कृति करण्यास प्रवृत्त होतो; तेव्हा ह्या हेतूंचे कोणत्या प्रकारचे स्वरूप आहे हे आपणांस समजणे अवश्य आहे.
 (२) जो हेतु सर्वांत प्रबल असेल तोच आपला अंमल प्रवर्तक शक्तीवर चालवितो; अर्थात् त्या हेतूच्या तंत्रानेच आपण वागण्यास प्रवृत्त होतो. उदाहरणार्थ-एखादा मुलगा शाळेत जात असतां रस्त्यांत काही गम्मत दृष्टीस पडते ( गारुड्याचा खेळ असे आपण समजू ) ती गम्मत पाहण्याच्या हेतूने तो मुलगा शाळेत न जाता तसाच तेथे उभा रहातो. शाळेत वेळेवर न गेल्यास आपले फार नुकसान होईल हे त्याच्या मनांतसुद्धां येत नाही.
 (३) हेतूंचे खरे स्वरूप समजणे म्हणजे मुलांच्या स्वभावांची पूर्ण माहिती होणे; व ही माहिती शिक्षकास किती महत्त्वाची असते याचा वेळोवेळी उल्लेख केला आहेच.
 (४) हेतूंच्या स्वरूपांची शिक्षकास पूर्ण ओळख झालेली असली म्हणजे त्यास योग्य त्या हेतूचा योग्य वेळी व योग्य ठिकाणी उपयोग करितां येतो. एकाच प्रकारचे हेतु सर्व काली व सर्व ठिकाणी